चांदोली धरणात यावर्षी समाधानकारक पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:21 AM2021-05-15T04:21:36+5:302021-05-15T04:21:36+5:30
सतीश नांगरे लोकमत न्यूज नेटवर्क शित्तूर-वारुण : चांदोली धरणात सध्या १६.२२ टीएमसी पाणीसाठा असून, यातील उपयुक्त पाणीसाठा ९.३४ टीएमसी ...
सतीश नांगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
शित्तूर-वारुण :
चांदोली धरणात सध्या १६.२२ टीएमसी पाणीसाठा असून, यातील उपयुक्त पाणीसाठा ९.३४ टीएमसी इतका आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा १.३८ टीएमसीने अधिक आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा अधिक असला तरी गेल्या तीन महिन्यांतील पाण्याचा वापर लक्षात घेता जानेवारी ते एप्रिल या तीन महिन्यांत ९ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याला साधारण ३ टीएमसी पाणी वापरले गेले आहे.
एक एप्रिल रोजी धरणात उपयुक्त पाणीसाठा १६.८५ टीएमसी होता. तर आज १४ मे रोजी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ९.३४ टीएमसी आहे. म्हणजेच गेल्या ४४ दिवसांत ७.५१ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.
सध्या धरणातून वाकुर्डे व म्हैसाळ योजनेसाठी पाणी सोडले जात आहे. तसेच उन्हाळी आवर्तन सुरू असल्यामुळे दर पंधरा दिवसांनी कालव्यामार्फत शेतीसाठी पाणी सोडले जात आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस अधिक वाढू लागली आहे. त्यामुळे पाण्याची मागणीही साहजिकच वाढणार आहे. त्यामुळे सध्या महिन्याला साडेतीन टीएमसी वापर होत असलेले पाणी आता किमान अर्धा ते एक टीएमसीने पाणी जास्त सोडावे लागणार आहे.
परिणामी पुढील दोन महिन्यांत म्हणजेच चौदा जुलैपर्यंत धरणातून किमान आठ ते नऊ टीएमसी पाणी संपणार आहे. म्हणजेच थोडक्यात चौदा जुलैपर्यंत धरणातील उपयुक्त पाणीसाठा पुरेल, अशी सध्या तरी चिन्हे आहेत.
धरण प्रशासनानेही गतवर्षीची आकडेवारी विचारात घेऊन यंदाही पाण्याचे योग्य नियोजन केले आहे. त्यामुळे सध्या तरी पाण्याची टंचाई भासलेली नाही. भविष्यातही या आकडेवारीचा विचार करून पाण्याचा विसर्ग करावा, जेणेकरून भविष्यात पाऊस उशिरा सुरू झाला तरी पाण्याची टंचाई जाणवणार नाही.
चौकट- १०/०५/२०२१ ची आकडेवारी-
पाणीपातळी : ६०५.१५ मीटर
पाणीसाठा टीएमसी : १६.२२
उपयुक्त पाणीसाठा : ९.३४ टीएमसी
विसर्ग : १२६० क्युसेक्स
१४ चांदोली
फोटो :
चांदोली धरणात सध्या ९.३४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. (छाया : सतीश नांगरे)