सतीश पाटील समर्थकांचा विरोधी आघाडीला पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:22 AM2021-04-26T04:22:03+5:302021-04-26T04:22:03+5:30
गडहिंग्लज : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी विरोधी आघाडीकडून इच्छुक असलेले जि.प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांना ऐनवेळी माघार घ्यावी लागली; परंतु राष्ट्रवादी ...
गडहिंग्लज : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी विरोधी आघाडीकडून इच्छुक असलेले जि.प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांना ऐनवेळी माघार घ्यावी लागली; परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील निष्ठा व नेत्यांचा आदेश प्रमाण मानून त्यांनी आपल्या समर्थकांसह विरोधी राजर्षी शाहू आघाडीला आज (रविवारी) पाठिंबा दिला.
पालकमंत्री सतेज पाटील व मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीच्या प्रचारासाठी येथील सूर्या सांस्कृतिक सभागृहात गडहिंग्लज तालुक्यातील ठरावधारकांचा मेळावा झाला. तत्पूर्वी, गिजवणे येथे एकत्र जमलेल्या आपल्या समर्थक गांधी टोपी परिधान केलेल्या १०६ ठरावधारकांसह गडहिंग्लजच्या प्रचार मेळाव्यात सहभागी होऊन पाटील यांनी विरोधी आघाडीला पाठिंबा दिला.
पाटील म्हणाले, आपणही गेले वर्षभर निवडणुकीची तयारी केली होती; परंतु दुर्दैवाने उमेदवारी मिळाली नाही. तरीदेखील मंत्री मुश्रीफ यांच्या आदेशानुसार आपण विरोधी आघाडीच्या विजयासाठी मनापासून झटत आहोत. मंत्री मुश्रीफ व पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखालील दीर्घकालीन लढाईमुळेच सत्ताधाऱ्यांचा ‘मल्टी-स्टेट’चा डाव उधळला. त्यामुळेच आपल्या मतदानाचा हक्क शाबूत राहिला आहे. ‘गोकुळ’ शेतकऱ्यांच्या मालकीचा होण्यासाठी सर्व ताकदीनिशी आघाडीला बळ देऊ या.
यावेळी गडहिंग्लज कारखान्याचे माजी संचालक प्रकाश पताडे, जखेवाडीचे माजी सरपंच भीमराव राजाराम, मासेवाडीचे माजी सरपंच दशरथ कुपेकर, इंचनाळचे माजी सरपंच आनंदराव पोवार, माजी सभापती दीपक जाधव, प्रकाश पाटील, प्रकाश देसाई, महेश धुमाळ, महादेव केसरकर, कृष्णा शिंदे, शहाजी कापसे आदींसह ठरावधारक उपस्थित होते.
---------------------------------------------
फोटो ओळी : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील बी.टी. पाटील सहकार संकुलासमोर ‘गोकुळ’च्या ठरावधारकांना जि.प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दीपक जाधव, प्रकाश पताडे, नितीन पाटील, दशरथ कुपेकर, भीमराव राजाराम आदी उपस्थित होते.
क्रमांक : २५०४२०२१-गड-०७