सतीश सूर्यवंशीची अण्णा कोळेकरवर मात
By admin | Published: November 15, 2015 10:36 PM2015-11-15T22:36:53+5:302015-11-15T23:50:19+5:30
वाळवा कुस्ती मैदान : तासाभराच्या झुुंजीनंतरही मैदानी निकाल न झाल्याने शौकिनांची निराशा
वाळवा : गांधी तालीम मंडळ वाळवा यांच्यावतीने घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात मामासाहेब कुस्ती पुणेचा मल्ल सतीश सूर्यवंशी (भाटवडे) याने महावीर केसरी अण्णा कोळेकर (गंगावेस) याच्यावर ५३ व्या मिनिटास गुणावर मात करून प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपये, मानाची चांदीची गदा आणि चषकाचे बक्षीस पटकाविले.
प्रथम क्रमांकाची कुस्ती मल्ल सतीश सूर्यवंशी विरुद्ध अण्णा कोळेकर यांच्यात झाली. दोन्ही मल्ल बलदंड होते, परंतु त्यांनी गर्दनखेच, मान व मनगटाची ताकद अजमाविणे, चुकून पट काढण्याचा पोकळ प्रयत्न करणे, यातच आपला तब्बल एक तास वाया घालविला. कुस्ती शौकिनांची या कुस्तीने घोर निराशा झाली. शेवटी ५३ व्या मिनिटास मल्ल सूर्यवंशीला गुणांवर विजयी घोषित करण्यात आले.
सतीश सूर्यवंशी याला खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत, जिल्हा शिवसेना प्रमुख आनंदराव पवार, सरपंच गौरव नायकवडी, कुस्ती कमिटी अध्यक्ष गणपती साळुंखे, माजी उपसरपंच नंदू पाटील, हुतात्मा साखरचे संचालक सुरेश होरे, कमिटीचे उपाध्यक्ष शंकरराव थोरात, संजय अहिर, श्याम कदम यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले.
द्वितीय क्रमांकासाठीची पहिली कुस्ती न्यू मोतीबाग तालीम, कोल्हापूरचा मल्ल संभाजी कळसे विरुद्ध भोसले तालीम सांगलीचा रामदास पवार यांच्यात झाली. सांगलीच्या रामदास पवार याने गुणांवर मात करून ती जिंकली. त्याला हुतात्मा दूध संघ, वाळवा अध्यक्ष भगवान पाटील पुरस्कृत ७५ हजारांचे बक्षीस व मानाची चांदीची गदा व कायम चषक देण्यात आले. दुसऱ्या क्रमांकासाठीची दुसरी कुस्ती न्यू मोतीबाग तालीम, कोल्हापूरचा मल्ल प्रशांत शिंदे विरुद्ध शाहूपुरी कोल्हापूरचाच राहुल सरक यांच्यात झाली. ४५ मिनिटांनी ती बरोबरीत सोडविण्यात आली.
तृतीय क्रमांकाची कुस्ती गांधी तालीम, वाळव्याचा मल्ल सुजित नवले विरुद्ध भोसले व्यायामशाळा सांगलीचा सुदेश ठाकूर यांच्यात झाली. यात सहाव्या मिनिटालाच हात काढून घिस्सा डावावर सुजित नवलेने सुदेश ठाकूरला चितपट केले. त्याला किसान नं. ३ सहकारी पाणीपुरवठा पुरस्कृत बक्षीस ३५ हजार रुपये अध्यक्ष सावकर दादा कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच रघुनाथ मेटकरी यांच्याकडून चांदीची कायम गदाही देण्यात आली.
चौथ्या क्रमांकाची कुस्ती राजारामबापू कुस्ती केंद्राचा मल्ल अजय निकम (रेड) विरुद्ध शाहूपुरी, कोल्हापूरचा पप्पू माने यांच्यात झाली. यात अजय निकम याने पप्पू मानेस चितपट केले व स्वातंत्र्यसैनिक विलासराव थोरात (आबाजी) वाळवा सहकारी दूध संस्था वाळवा पुरस्कृत रोख २५ हजारांचे बक्षीस मिळविले.
प्रारंभी दुपारी तीन वाजता जैनुद्दीन पिरजादे यांच्या हस्ते आखाडा पूजन करण्यात आले. यावेळी राम सारंग, विकास पाटील, प्रकाश पाटील, महाराष्ट्र चॅम्पियन कुंडलिक गायकवाड, संजय खोत, सुहास माने, नंदू पाटील, हणमंत जाधव (सांगली), अशोक नागराळे (शाहूपुरी, कोल्हापूर), संपत जाधव (चिंचोली), संभाजी पाटील (कुडित्रे), गणपती साळुंखे, शंकर आप्पा थोरात, मोहन सव्वाशे, बाळासाहेब पाटील, पांडुरंग अहिर, बाळासाहेब तांदळेकर उपस्थित होते. (वार्ताहर)
मल्ल शिवानी खोत विरुद्ध संजना बागडी (तुंग) यांच्यात एकमेव महिलांची कुस्ती झाली. त्यात शिवानी खोत हिने विजयी पताका या मैदानात फडकविली.