‘लक्षवेधी’ ठरविणार सत्तेची सूत्रे-

By admin | Published: February 11, 2017 11:22 PM2017-02-11T23:22:53+5:302017-02-11T23:22:53+5:30

लक्षवेधी लढती -- वजाबाकाी

Satta formulas to decide 'Noteworthy' | ‘लक्षवेधी’ ठरविणार सत्तेची सूत्रे-

‘लक्षवेधी’ ठरविणार सत्तेची सूत्रे-

Next

जिल्हा परिषदेची पंचवार्षिक निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी त्याबाबतची उत्सुकता ताणली जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे चार प्रमुख पक्ष एकमेकांविरोधात आमने-सामने ठाकले असून, केवळ काँग्रेसने ५० पैकी ४९ जागी उमेदवार उभे करून उमेदवारी देण्यात तरी आघाडी घेतली आहे. त्याखालोखाल शिवसेना, भाजप हे पक्ष असून, राष्ट्रवादी चौथ्या स्थानावर आहे. काँग्रेसने दोडामार्ग तालुक्यातील एक जागा राष्ट्रवादीसाठी म्हणजे सुरेश दळवी यांच्यासाठी सोडली आहे. ते वगळता जिल्ह्यात सर्व तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या जागांवर काँग्रेस लढत आहे, तर शिवसेना आणि भाजपने कणकवली, देवगड आणि वैभववाडी मतदारसंघात बऱ्याच जागांसाठी ‘फिक्सिंग’ केले आहे.
सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, कुडाळ आणि मालवण या पाच तालुक्यांत बहुतांश जागांसाठी काँग्रेस, शिवसेना, भाजप अशी तिरंगी लढत होणार आहे. जिल्ह्यातील एकूण ५० मतदारसंघांचा अभ्यास करता जिल्ह्यातील १० लढती अतिशय लक्षवेधी आहेत आणि या लढतीच जिल्हा परिषदेच्या सत्तेची सूत्रे ठरविणार आहेत. या लक्षवेधी लढतींमध्ये दोडामार्ग तालुक्यातील माटणे, सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव, वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण, कुडाळ तालुक्यातील आंब्रड, नेरूर, पिंगुळी, माणगाव आणि ओरोस, तर मालवण तालुक्यातील पेंडूर आणि वायरी-भूतनाथ या मतदारसंघांचा समावेश आहे.
मागील जि. प. निवडणुकीत काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप यांची एकत्रित महायुती झाली होती. त्यावेळी काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली होती. मात्र, त्यावेळी काँग्रेस आघाडीचे सरकार राज्यात आणि देशात होते. नारायण राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री होते. आताची परिस्थिती वेगळी आहे. यावेळी राज्यात आणि देशात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आहे आणि काँग्रेसला आता सत्ताधारी शिवसेना आणि भाजपशी टक्कर द्यायची आहे. त्यात काँग्रेसचा आमदार असलेल्या कणकवली-देवगड-वैभववाडी या तीन मतदारसंघांत शिवसेना-भाजपने छुपी युती केली आहे, तर राष्ट्रवादी दोडामार्ग वगळता जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक रिंगणात आहे. मात्र, त्यांनी हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच मोजके उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत.
जिल्ह्यातील राजकीय गणिते ठरविण्यात कुडाळ तालुका कायमच अग्रेसर राहिला आहे. मागील निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसच्या विजयाचा वारू सुसाट होता. मात्र, त्याला काहीसा ब्रेक लावण्याचे काम कुडाळ तालुक्यानेच केले होते. त्यानंतर सन २0१४ मध्ये काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यात कुडाळ तालुक्यातील मतदारच सरसावले होते. आतापर्यंतचा अभ्यास करता कुडाळ शहर आणि तालुक्यात शिवसेनेला मानणारा मोठा मतदार आहे. हे जरी खरे असले तरी नव्याने निर्माण झालेल्या कुडाळ नगरपंचायतीची सूत्रे पुन्हा एकदा कुडाळवासीयांनी काँग्रेस नेते नारायण राणेंच्याच हातात दिली आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या ९ जागांपैकी ५ जागांवरील लढाई अतिशय प्रतिष्ठेची आहे. काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशा होणाऱ्या या तिरंगी लढाईत कोण बाजी मारते यावर जिल्ह्यातील बहुतांश राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत.
कुडाळ तालुक्यातील आंब्रड मतदारसंघात काँग्रेसने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. तर या ठिकाणी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज लॉरेन्स मान्येकर यांनी शेवटच्या क्षणी भाजपमधून उमेदवारी दाखल केली आहे. शिवसेनेकडून महिला जिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत निवडणूक रिंगणात आहेत, तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल सुद्रीक आहेत. त्यामुळे येथील लढत ही चौरंगी होणार आहे. या अटीतटीच्या लढाईत कोण बाजी मारते याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
नेरूर मतदारसंघात काँग्रेसचे माजी जि. प. उपाध्यक्ष रणजित देसाई, राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले पं. स. सदस्य अतुल बंगे आणि भाजपचे चारुदत्त देसाई अशी तिरंगी लढत होणार आहे. या ठिकाणी काँग्रेसच्या रूपेश पावसकर यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे, तर राष्ट्रवादीतून आलेल्या अतुल बंगेंना उमेदवारी दिल्यामुळे स्थानिक शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज आहेत.
माणगाव मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रमाकांत तामाणेकर यांच्यासह बबन बोभाटे यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, सेनेने राजेश कविटकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे या ठिकाणी अंतर्गत नाराजी आहे. काँग्रेसचे हेमंत भगत, राष्ट्रवादीचे संदीप राणे आणि भाजपचे शशीभूषण खोचरे अशी चौरंगी लढत येथे होणार आहे.
पिंगुळी मतदारसंघात माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते हे शिवसेनेकडून रिंगणात असून, त्यांना काँग्रेसचे साळगाव येथील बंड्या मांडकुलकर यांच्याशी थेट लढत द्यायची आहे. या ठिकाणी काँग्रेसचे माजी जि. प. अध्यक्ष विकास कुडाळकर यांची भूमिका महत्त्वाची असून, अतिशय प्रतिष्ठेच्या असलेल्या या लढाईत कोण बाजी मारते याकडे लक्ष लागले आहे.
ओरोस मतदारसंघातील लढाईदेखील अतिशय चुरशीची होणार आहे. या ठिकाणी काँग्रेसने स्थानिक इच्छुकांना डावलून मूळच्या दोडामार्ग येथील समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी शिवसेनेकडून सुनील जाधव, बसपकडून रवींद्र कसालकर तर जनता दलाकडून महेश परुळेकर यांनी अर्ज दाखल केला आहे.
सावंतवाडी तालुक्याचा विचार करता तालुक्यातील कोलगाव जि. प. मतदारसंघातील राजकीय लढाई अतिशय प्रतिष्ठेची आहे. या ठिकाणी काँग्रेसचे सावंतवाडी पं. समितीतील उपसभापती महेश सारंग यांनी भाजपात प्रवेश करीत तिकीट मिळविल्याने त्यांच्याविरोधात शिवसेनेकडून मायकल डिसोजा आणि काँग्रेसकडून पं. स. सभापती प्रमोद सावंत निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या लढाईकडे संपूर्ण सिंधुदुर्गवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. महेश सारंग हे शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक होते. मात्र, शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि खासदार राऊत आणि पालकमंत्री केसरकर यांच्यातील अंतर्गत वादामुळे सारंग यांना प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे सारंग यांनी भाजपची वाट धरली. त्यामुळे कोलगावातील तिरंगी लढाईत कोण बाजी मारणार यासाठी २३ फेबुवारीची वाट पाहावी लागणार आहे.
दोडामार्ग तालुक्यात तीन जिल्हा परिषद मतदारसंघांपैकी माटणे मतदारसंघात ‘काँटे की टक्कर’ होणार आहे. यात काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, भाजपचे विद्यमान जि.प. सदस्य राजेंद्र म्हापसेकर आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी यांच्यात लढत होणार आहे. माटणेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णीही इच्छुक होते. त्यामुळे या ठिकाणी दोन राजेंद्रांमधील लढाईत धुरी किती मते घेतात यावर विजयाची गणिते ठरणार आहेत.
वेंगुर्ले तालुक्याचा विचार करता म्हापण मतदारसंघातील लढत अतिशय लक्षवेधी आहे. या ठिकाणी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले पंचायत समितीचे माजी सभापती सुनील म्हापणकर यांच्या विरोधात काँग्रेसने शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या भोगवे गावचे सरपंच सुनील राऊत यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपकडून विकास गवंडे हे रिंगणात आहेत. एकमेकांविरोधात पक्ष प्रवेश करून लढणाऱ्या या लढाईत कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता आहे.
सन २०१२च्या जिल्हा परिषद निवडणुकीत मालवण तालुक्यात सर्वच्या सर्व म्हणजे सहा जागा काँग्रेसने एकतर्फी मिळविल्या होत्या. तसेच पंचायत समितीतही काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. यावेळी मात्र, जिल्हा परिषदेचा विचार करता पेंडूर आणि वायरी-भूतनाथ या दोन मतदारसंघात सद्य:स्थितीत शिवसेना आघाडीवर दिसत आहेत. पेंडूर मतदारसंघात काँग्रेसने पंचायत समितीतील माजी उपसभापती संतोष साटविलकर यांना रिंगणात उतरविले असून, शिवसेनेकडून डॉ. रूपेश परुळेकर हे नशीब आजमावत आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादीने तालुक्यातील एकमेव उमेदवार दिल्यामुळे येथील लढाई काहीशी तिरंगी बनली आहे. परंतु, खरी लढत ही साटविलकर आणि परुळेकर यांच्यातच होणार आहे.
मतदारसंघाच्या पुनर्रचनेत यावेळी देवबाग मतदारसंघाचे नाव बदलून वायरी-भूतनाथ झाले आहे. या ठिकाणी शिवसेनेने हरी खोबरेकर यांना उमेदवारी दिली असून, काँग्रेसकडून राजन सारंग, तर भाजपने तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांना रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे या ठिकाणीही तिरंगी लढत होणार आहे. मालवण तालुक्यातील या दोन जागा वगळता आडवली-मालडी, आचरा, मसुरे आणि शिरवंडे या चार मतदारसंघांत काँग्रेसचे पारडे जड आहे.
कणकवली तालुक्याचा विचार करता काँग्रेसने दिलेल्या उमेदवारांविरोधात शिवसेना आणि भाजपकडून देण्यात आलेले उमेदवार चुरशीची लढत देतील असे सद्य:स्थितीत तरी वाटत नाही. वैभववाडी तालुक्यातील तीन जागांसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाल्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या लढती रंगतदार आहेत. त्यामुळे देवगड, कणकवली आणि वैभववाडी या तीन तालुक्यांतील विधानसभेच्या कणकवली मतदारसंघात ज्याप्रमाणे नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे पारडे जड राहिले. तशीच काहीशी परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील पाच तालुक्यांत शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढत आहेत आणि केवळ देवगड, कणकवली आणि वैभववाडीत काही जागांसाठी छुपी युती करण्यात आल्याने त्याबाबतचा अप्प्रचार काँग्रेसकडून सध्या जोरदार सुरू आहे. त्यामुळे मतदारांवर यातून परिणाम होऊ शकतो.
देवगड नगरपंचायतीत काँग्रेसने मिळविलेल्या यशाचा परिणामही या निवडणुकीत काँग्रेससाठी जमेची बाजू ठरू शकतो. त्यामुळे विधानसभेच्या तिन्ही मतदारसंघांचा विचार करता कणकवली मतदारसंघ काँग्रेससाठी, तर कुडाळ आणि सावंतवाडी हे दोन मतदारसंघ शिवसेनेसाठी लाभदायक आहेत. त्यात सावंतवाडी आणि कुडाळ मतदारसंघात भाजपने ठिकठिकाणी उमेदवार उभे केल्यामुळे युतीतील मतफुटीचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल पालिका निवडणुकीप्रमाणे धक्कादायक लागतो की मतदार पुनरावृत्ती करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महेश सरनाईक

Web Title: Satta formulas to decide 'Noteworthy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.