शनिवार पेठ अद्यापही भीतीच्या छायेखाली !

By admin | Published: January 24, 2016 12:52 AM2016-01-24T00:52:12+5:302016-01-24T00:52:12+5:30

इमारत कोसळल्यानंतर : काजवे कुटुंबीय नातेवाइकांकडे; उपायुक्त खोराटे यांच्याकडून पाहणी

Saturn Peth still under the shadow of fear! | शनिवार पेठ अद्यापही भीतीच्या छायेखाली !

शनिवार पेठ अद्यापही भीतीच्या छायेखाली !

Next

कोल्हापूर : शनिवार पेठेत झालेल्या तीन मजली इमारत कोसळल्याच्या घटनेनंतर नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. शनिवारी दिवसभर क्रेनच्या साहाय्याने खुदाई करण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये वाळूची पोती टाकण्यात येत होती; तर साहित्य काढण्याचे काम सुरू होते.
घरमालक प्रकाश काजवे कुटुंबीय हे नागाळा पार्क येथील त्यांच्या नातेवाइकांकडे राहावयास
गेले आहेत; तर काजवे यांच्या शेजारील चव्हाण कुटुंबीयांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिकेचे उपायुक्त विजय खोराटे व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी शनिवारी सायंकाळी पाहणी केली.
शनिवार पेठेतील साळी गल्लीमध्ये अपार्टमेंटसाठी खुदाई करण्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी सकाळी या ठिकाणी असलेले प्रकाश काजवे यांची तीन मजली इमारत पत्त्यांच्या इमारतीप्रमाणे कोसळली. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, आज शनिवार दिवसभर या परिसरात नागरिक घराबाहेर थांबून होते. या ठिकाणी अग्निशामक दलाचा बंब लावण्यात आला आहे.
त्याचबरोबर क्रेनच्या साहाय्याने खड्ड्यात बेचिराख झालेले साहित्य काढण्याचे काम सुरू होते; तर शेजारील कोणत्याही इमारतींना धोका पोहोचू नये यासाठी वाळूने भरलेली शंभरहून अधिक पोती टाकण्यात आली. यासाठी पद्माराजे गल्ली (एस.पी. बॉईज) येथून सोन्यामारुती चौकाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता.
बिल्डर करण मानेला होणार अटक
शनिवार पेठ, साळी गल्ली येथे नियमापेक्षा जास्त पायाखुदाई करून शेजारील इमारतीला धोका निर्माण केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत बिल्डर करण भगवंतराव माने (रा. नागाळा पार्क) यांच्यावर कलम ३३६, २८८,४२७ (नियमबाह्य व बेपर्वाई) गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्यांना अटक करू, असे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हरिदास घोलप यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले. साळी गल्लीत अपार्टमेंट बांधकामासाठी पायाखुदाई सुरू असताना बिल्डर करण माने यांच्या बेपर्वाईमुळे शेजारील प्रकाश काजवे यांची इमारत कोसळली. त्यामध्ये ६५ लाख रुपयांचे नुकसान झाले. महापालिकेचे कनिष्ठ अभियंता अरुण आबदेव गुजर (रा. रचना अपार्टमेंट, नागाळा पार्क) यांनी बिल्डर माने यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांत शुक्रवारी रात्री फिर्याद दिली. पोलिसांनी पंचनामा केला असून काजवे, त्यांचे कुटुंब व शेजाऱ्यांचे जबाब घेतले आहेत.
दर्जाकडेही लक्ष द्या : व्ही. बी. पाटील
मूळ इमारतीचे बांधकामही चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे शनिवार पेठेतील तीन मजली इमारत कोसळल्याची प्रतिक्रिया बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील यांनी दिली. सिमेंट-कॉँक्रीटची इमारत कशी काय ढासळली, त्याची कारणे काय, याबाबत पाटील म्हणाले, ‘इमारतीचे डिझाईन करून घेण्यास हल्ली पैसे द्यावे लागतात, म्हणून अनेकजण तज्ज्ञांकडून ‘स्ट्रक्चरल डिझाईन’ करून घेत नाहीत. त्यामुळे किती मजले आहेत, कॉलमची क्षमता किती हवी, स्टील किती क्षमतेचे वापरावे, सिमेंट किती वापरवे, याचे निकष पाळतच नाहीत. कित्येकजण सेंट्रिंगवाल्यांकडूनच डिझाईन करून घेतात. त्यांचा तोच इंजिनिअर असतो. कोसळलेल्याइमारतीच्या शेजारच्या बिल्डरने पायाखुदाई जास्त केली हे जसे महत्त्वाचे आहे; तसेच कोसळलेल्या इमारतीच्या बांधकाम दर्जाबाबत सुपरव्हिजन करणाऱ्याने लक्ष दिलेले नाही’ पैसे वाचविण्यासाठी स्वत:सह कुटुंबाचा जीव धोक्यात घालतो. या दुर्घटनेत काजवे कुटुंबीयांचे नशीब बलवत्तर म्हणूनच ते घराबाहेर पडले. त्यामुळे गावठाण भागात घरे बांधताना त्यांच्या दर्जाकडेही लक्ष द्यावे, असे व्ही. बी. पाटील यांनी सुचविले.

Web Title: Saturn Peth still under the shadow of fear!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.