साताऱ्याची पूनम चकाकली!
By admin | Published: March 16, 2017 11:25 PM2017-03-16T23:25:59+5:302017-03-16T23:25:59+5:30
राज्य सेवा मुख्य परीक्षेत महिलांमध्ये राज्यात प्रथम
सातारा/पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलिस उपअधीक्षक पदासाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेत साताऱ्याची लेक पूनम पाटील हिने महिलांमधून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. पूनम पाटील हिचे वडील संभाजी पाटील हेही पोलिस दलात सांगली जिल्ह्यातील तुरची येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात पोलिस उपअधीक्षकपदी कार्यरत आहेत.
साताऱ्याच्या विलासपूर येथे वास्तव्यास असणाऱ्या पूनमचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेत झाले. सातवीत शिकत असताना तिची शिष्यवृत्तीसाठी राज्यात निवड झाली. त्यानंतर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये घेतले. दहावीत ९४.४२ टक्के गुण मिळवून जिल्ह्णात प्रथम क्रमांक पटकावला होता. साताऱ्याच्या लाल बहाद्दूर शास्त्री महाविद्यालयात तिने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले.
बारावीत ९१ टक्के गुण मिळवून ती गुणवत्ता यादीत चमकली. त्यानंतर तिने पुणे विद्यापीठातून बी.ई मेकॅनिकल पदवी संपादन करून दुसरा क्रमांक मिळविला. २०१३ मध्ये या पदवी परीक्षेत तिने ७८ टक्के माके मिळवले. त्यावेळी कॉलेज कॅम्पस इंटरव्ह्णूमधून तिची पुण्याच्या टाटा टेक्नॉलॉजीमध्ये अभियंता म्हणून निवड झाली. त्याठिकाणी दोन वर्षे पूनमने अभियंता म्हणून नोकरी केली. नोकरी करीत असतानाच तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. (प्रतिनिधी)