सत्यजित पाटील यांची एकहाती सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2017 11:35 PM2017-02-24T23:35:05+5:302017-02-24T23:35:05+5:30
‘जनसुराज्य’ची दमदार वाटचाल : दोन्ही गायकवाड गटांवर आत्मचिंतन करण्याची गरज
राजाराम कांबळे-- मलकापूर---शाहूवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांनी शाहूवाडी पंचायत समितीवर आपली एकहाती सत्ता मिळविली. मात्र, जनसुराज्य पक्षाचे माजी मंत्री विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाने जिल्हा परिषदेची एक व पंचायत समितीची एक जागा मिळवून तालुक्यात दमदार वाटचाल सुरू केली आहे. गेली अनेक वर्षे सत्तेचे राजकारण करणारे शाहूवाडीचे मानसिंगराव गायकवाड व काँग्रेसचे करणसिंह गायकवाड या दोन्ही गटांना हा निकाल आत्मचिंतन करायला लावणारा आहे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना, मनसे, शेकाप जनतेच्या परीक्षेत नापास झाले आहेत. येथून पुढे तालुक्यात शिवसेना विरुद्ध जनसुराज्य असाच सामना होणार आहे.
तालुक्यात पक्षापेक्षा गटाचे राजकारण मोठ्या प्रमाणात चालत असते. स्वतंत्र लढण्याची कोणत्याच गटात ताकद नसल्याने सेना व जनसुराज्य पक्षाने तालुक्याच्या जनतेच्या मनात प्रेम उत्पन्न केल्यामुळे या दोन पक्षांना जनतेत स्थान आहे. तर राष्ट्रवादी व काँग्रेस यांना भविष्यात जनतेत स्थान निर्माण करण्यासाठी झगडावे लागणार आहे.
सेनेचे आमदार सत्यजित पाटील यांनी रणवीरसिंग गायकवाड यांची उमेदवारी जाहीर करून लढत प्रतिष्ठेची केली होती. सत्यजित पाटील, मानसिंगराव गायकवाड यांनी या निवडणुकीत सर्व शक्तीचा वापर केला. मात्र, सर्जेराव पाटील यांनी शांत डोक्याने या निवडणुकीत धोबीपछाड डावावर रणवीर गायकवाड याला दोन हजार मतांनी चितपट केले. मात्र, सत्यजित पाटील यांचा पैरा फेडण्याचे अपुरे स्वप्न राहिले.
पिशवी गटात करणसिंह गायकवाड गटाचे महादेव पाटील यांना अंतर्गत कुरघोडीचा तोटा होऊन पराभवाला सामोरे जावे लागले. येथे राष्ट्रवादीने आपला उमेदवार निवडून आणला. तर करंजफेण गटात सेनेच्या आकांक्षा पाटील या विजयी झाल्या. कर्णसिंह गायकवाड व मानसिंगराव गायकवाड या दोन गटांनी आत्मचिंतन करून आपण जनतेच्या परीक्षेत का ‘फेल’ झालो, याचा विचार करणे गरजेचे आहे. खासदार राजू शेट्टी यांना भरघोस मते देऊन शाहूवाडीच्या जनतेने त्यांच्यावर प्रेम केले. मात्र, या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांना विजयापर्यंत जाता आले नाही. मनसे व शेकाप यांना तालुक्यात कार्यकर्त्यांची बांधणी करावी लागणार आहेत
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कडवे गावातील तीन उमेदवार विजयी झाले आहेत. तालुक्याच्या राजकारणात एकाच गावातील तीन उमेदवार विजयी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
एकाच गावातील तिघे विजयी
मलकापूर बाजारपेठेपासून पाच किलोमीटर अंतरवार कडवे गाव आहे. गावची लोकसंख्या साडेतीन हजारांच्या आसपास आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून करंजफेण गटातून आकांक्षा अमर पाटील, जनसुराज्य पक्षाकडून कडवे गणातून अरसिंह नारायण खोत, तर शित्तूर-वारुण गणातून विजय नामदेव खोत निवडणुकीत उभे होते.
निकाल जाहीर झाला तेव्हा तिन्ही उमेदवार विजयी झाले होते. तिन्ही उमेदवारांची घरे देखील जवळजवळ आहेत. विजय खोत माजी मंत्री विनय कोरे यांचा कार्यकर्ता आहे. अमरसिंह खोत करणसिंह गायकवाड यांचा कार्यकर्ता आहे. तर आकांक्षा पाटील या सेनेच्या कार्यकर्त्या आहेत. कडवे गावात आनंदाचे वातावरण आहे.