सतेज यांचे आव्हान पी.एन. यांच्या पथ्यावर
By admin | Published: January 30, 2015 12:09 AM2015-01-30T00:09:26+5:302015-01-30T00:15:05+5:30
‘गोकुळ’चे रणांगण : सत्तारूढ गटात दबदबा कायम; पॅनेल निश्चितीतही राहणार वरचष्मा
विश्वास पाटील - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ (गोकुळ)च्या निवडणुकीत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आव्हान दिल्यामुळे सत्तारूढ गटातील ज्येष्ठ नेते माजी आमदार पी. एन. पाटील यांचा दबदबा पुन्हा वाढला आहे.
पी. एन. पाटील, सतेज पाटील व माजी खासदार सदाशिवराव मंडलिक हे एकत्र आले तर संघातील राजकारण बदलू शकते, हे माहीत असल्याने आमदार महादेवराव महाडिक ‘पी. एन. साहेब’च गोकुळचे नेते असल्याची भाषा बोलू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर काही दिवस एका ज्येष्ठ संचालकांच्या ताराबाई पार्कातील बंगल्यात आमदार महाडिक यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. तिथे पी.एन.ना वगळून स्वतंत्र पॅनेल करण्याची चर्चा झाली; परंतु त्यासंबंधी आता लगेच घाई करायला नको. विधानसभा निवडणुकीत काय होते ते पाहून नंतर ठरवू, असे ठरले. परंतु, ज्यांच्या घरी ही बैठक झाली, त्यांनीच पी. एन. पाटील यांना या बैठकीचा सर्व वृत्तांत दिला. पी. एन. आमदार असले किंवा नसले तरी गेली २५ वर्षे त्यांचा राजकीय दबदबा कायम आहे. काँग्रेसचे एकनिष्ठ नेते हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे. राज्यातील सत्तेचे ‘गोकुळ’ला संरक्षण मिळवून देण्यात पी. एन. यांचा वाटा मोठा राहिला. पी. एन. ‘गोकुळ’चे नेते आहेत, म्हणूनच हा संघ काँग्रेसच्या ताब्यात आहे, असे मानले गेले. आता राज्यात सत्ता नाही. पी. एन. विधानसभेलाही पराभूत झाले. त्यामुळे पी. एन. हेच संघाचे नेते आहेत, असे बोलण्यात मोठेपण द्यायचे. परंतु, प्रत्यक्षात त्यांना संचालकांच्या कमीत-कमी जागा देऊन बेदखल करण्याची व्यूहरचना होती. त्याला सतेज पाटील यांच्या मोर्चेबांधणीमुळे शह बसला आहे. सत्तारूढ गटाची संघाच्या सत्तेवर आजही चांगली मांड आहे हे खरे असले तरी काहीजणांबद्दल लोकांतही कमालीची नाराजी आहे. कारण या संचालकांनी विधानसभा, जिल्हा परिषद, साखर कारखाना आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत परस्परविरोधी भूमिका घेऊन अनेकांना दुखविले आहे. या सगळ्याचा राग म्हणून लोक काहीजणांना धडा शिकविण्याच्या तयारीत आहेत. अशा स्थितीत सत्तारूढ आघाडी कशी एकसंध राहील, असाच प्रयत्न आहे. त्यामुळेच पी. एन. जे म्हणतील, तेच या वेळेलाही पॅनेल निश्चितीत खरे होणार आहे.
खरा ‘राखणदार’
दिवंगत आनंदराव पाटील-चुयेकर हे संघाच्या स्थापनेपासून सलग ४४ वर्षे संचालक राहिले. चुयेकर आहेत म्हणून संघ चांगला आहे, अशी जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादकांत भावना राहिली. त्यामुळे सत्ता कुणाचीही आली तरी चुयेकर संघाचे ‘राखणदार’ म्हणून सत्तेत राहिले. दिवंगत संचालक राजकुमार हत्तरकी यांनीही तब्बल ३५ वर्षे संचालकपद भूषविले. आता या दोघांच्या वारसदारांना सत्तारुढ पॅनेलमध्ये घेण्याच्या हालचाली आहेत.
सतेज पाटील यांनी स्वतंत्र पॅनेल केल्यास त्यांना मानणारे संचालक बाबासाहेब चौगले यांना सत्तारूढ गटातून वगळले जाऊ शकते. ही जागाही आपल्याला हवी, असा पी. एन. यांचा आग्रह आहे. करवीर तालुक्यातून पाच संचालक आहेत. तेवढेच ते राहिले पाहिजेत, असा त्यांचा प्रयत्न आहे. महाडिक यांना ही जागा राधानगरी तालुक्यातील दूधगंगा काठ अथवा हातकणंगले तालुक्यास देण्याचा प्रयत्न आहे. आमदार अमल महाडिक यांनी ‘गोकुळ’ची निवडणूक लढविण्यास स्वत:हून नकार दिल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्या नावे दूध संस्थेचा ठरावही करण्यात आलेला नाही.
नवे वारसदार..
अरुण नरके यांच्याऐवजी संदीप नरके यांना पॅनेलमध्ये संधी दिली जावी, असा पी. एन. यांचा आग्रह होता व आहे. तसे नरके यांना त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखविले आहे; परंतु अरुण नरके यास तयार नाहीत. निवासराव पाटील यांच्याऐवजी त्यांचा मुलगा उदय यांना सत्तारुढ पॅनेलमधून संधी दिली जाऊ शकते.
कोण किती वर्षे सत्तेत
अरुण नरके : ४० वर्षे
रणजित पाटील : ४० वर्षे
रवींद्र पांडुरंग आपटे : ३५ वर्षे
अरुण डोंगळे : ३० वर्षे
विश्वास नारायण पाटील : ३५ वर्षे
दिलीप माने : १५ वर्षे
सुरेश पाटील : १२ वर्षे
निवासराव पाटील : १२ वर्षे
विश्वास शंकर जाधव : १२ वर्षे
दीपक भरमू पाटील : ५ वर्षे
धैर्यशील बजरंग देसाई : ५ वर्षे
पी. डी. धुंदरे : ५ वर्षे
बाबासाहेब चौगले : ५ वर्षे
दिनकर कांबळे : ५ वर्षे
अरुंधती संजय घाटगे : ५ वर्षे
अनुराधा बाबासाहेब पाटील : ५ वर्षे
अरुण डोंगळे यांचे चुलते रंगराव आबाजी डोंगळे व
भाऊ विजय डोंगळे प्रत्येकी पाच वर्षे सत्तेत