ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांना ‘सौहार्द सन्मान’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:32 AM2021-02-27T04:32:47+5:302021-02-27T04:32:47+5:30
हिंदी भाषेच्या प्रसार, प्रचाराचे काम करणारी उत्तर प्रदेश हिंदी संस्थान ही संस्था उत्तर प्रदेशच्या भाषा विभागाच्या अखत्यारित काम करते. ...
हिंदी भाषेच्या प्रसार, प्रचाराचे काम करणारी उत्तर प्रदेश हिंदी संस्थान ही संस्था उत्तर प्रदेशच्या भाषा विभागाच्या अखत्यारित काम करते. या संस्थेने यावर्षीच्या विविध पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्र सरकारच्या सयाजीराव गायकवाड साधन संकलन व प्रकाशन समितीच्यावतीने महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या समग्र साहित्याच्या दहा खंडांचे हिंदी भाषांतर प्रकाशित करण्यात आले आहे. दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या २० पुस्तकांचे हिंदी भाषांतर राजकमल प्रकाशनाने प्रकाशित करण्याची अनुमती दिल्यानंतर डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. आत्तापर्यंत १५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या दोन्ही अनुवाद प्रकल्पांचे मुख्य संपादक डॉ. लवटे आहेत. त्यांच्या आणि संपादक डॉ. गिरीश काशिद, समन्वय संपादक डॉ. विजय शिंदे त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथितयश अनुवादकांनी हा प्रकल्प पूर्ण केला. या प्रकल्पांची दखल घेत मराठी आणि हिंदी भाषेत निर्माण केलेल्या सोहार्दाची नोंद घेत डॉ. लवटे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यांनी वि. स. खांडेकर यांचे समग्र साहित्य संपादनाचे काम केले आहे. ते सध्या विश्वकोश मंडळाचे आद्यसंपादक आणि साहित्यिक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र साहित्याचे संपादन करत आहेत.
प्रतिक्रिया
हा संयुक्त कामाचा व्यक्तिगत पुरस्कार आहे. माझ्या विद्यार्थ्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या समग्र साहित्याचे हिंदी भाषांतर केले. त्यातील २५ ग्रंथांचे प्रकाशन झाले आहे. यानिमित्त मराठी आणि हिंदी भाषेत सौहार्द निर्मितीचे काम झाले. त्याची नोंद या पुरस्काराच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर घेतल्याबद्दल उत्तरप्रदेश सरकारचे मी अभिनंदन करतो. या पुरस्काराचे श्रेय माझ्या सर्व अनुवादक विद्यार्थ्यांना देतो.
- डॉ. सुनीलकुमार लवटे
चौकट
अन्य पुरस्कार विजेते
या संस्थेतर्फे मुंबईच्या सूर्यबाला यांना प्रमुख भारत-भारती सन्मान, डॉ. दयानंद पांडे यांना लोहिया साहित्य सन्मान, डॉ. रामेश्वर प्रसाद मिश्र यांना महात्मा गांधी साहित्य सन्मान, तर वर्ध्याच्या राष्ट्रभाषा प्रचार समितीला राजर्षी पुरुषोत्तमदास टंडन सन्मान पुरस्कार जाहीर झाला. प्रत्येकी चार लाख रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
फोटो (२६०२२०२१-कोल-सुनीलकुमार लवटे (पुरस्कार)