सौंदती, रेणुकादेवी मंदिर भाविकांना दर्शनाला बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:16 AM2021-07-05T04:16:14+5:302021-07-05T04:16:14+5:30
मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी कर्नाटक राज्यातील अनलॉक ३.० ची घोषणा करताना कोरोना काळातील विविध निर्बंध शिथिल केले होते. त्याचबरोबर राज्यातील ...
मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी कर्नाटक राज्यातील अनलॉक ३.० ची घोषणा करताना कोरोना काळातील विविध निर्बंध शिथिल केले होते. त्याचबरोबर राज्यातील विविध जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून जिल्हा पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंधाबाबत योग्य तो निर्णय घेण्याची सूचनाही केली होती. त्यानुसार सौंदत्ती रेणुका देवी देवस्थान बरोबरच सौंदत्ती जोगनभावी येथील सत्यवती देवी मंदिर पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. या तिन्ही मंदिरांत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश येथील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. सध्या बेळगाव जिल्ह्या लगतच्या महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव अद्यापही कायम आहे. महाराष्ट्रातील या तीन जिल्ह्यांमधून सौंदत्ती रेणुका देवस्थानला मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये याची दक्षता घेत, जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी सौंदती रेणुका मंदिरे व जोगनभावी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर सौंदत्ती रेणुका मंदिर परिसरातील संपूर्ण दुकाने पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात यावीत अशी सूचना ही सौंदती पोलिसांना करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेल्या आदेशाचे पालन करण्यात यावे. श्री रेणुकादेवी भक्तांनी घरात राहूनच देवीची आराधना करावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री रेणुका देवी देवस्थानचे विशेष कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती यांनी केले आहे.