मुख्यमंत्र्यांचा निरोप सावकरांना
By admin | Published: December 15, 2015 01:08 AM2015-12-15T01:08:42+5:302015-12-15T01:10:32+5:30
पालकमंत्री बनले दूत : महाडिक यांच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न
कोल्हापूर : सहकारमंत्री व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी सकाळी वारणा उद्योग समूहाचे नेते विनय कोरे यांची वारणानगर येथे जाऊन भेट घेतली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निरोप दिला. पालकमंत्र्यांनी मात्र नंतर ही भेट खासगी होती, असे पत्रकारांना सांगून घुमजाव केले आहे.फडणवीस व कोरे यांचेही जुने संबंध आहेत. त्यातच भाजप सरकारकडून वारणा दूध संघालाही आर्थिक मदत झाली आहे. केंद्रातील जसे भाजप सरकार राज्यसभेत अल्पमतात आहे, तसेच राज्य विधानपरिषदेतही भाजप अल्पमतात आहे. त्यामुळे विधानसभेत मंजूर झालेले विधेयक विधानपरिषदेत मंजूर होताना दोन्ही काँग्रेसवाल्यांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागतात किंवा वारंवार वटहुकूम काढावा लागतो. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जागा जेवढ्या कमी करता येतील तेवढ्या करण्याचे नियोजन सत्ताधारी भाजपने केले आहे. त्याचाच भाग म्हणून पालकमंत्र्यांनी विनय कोरे यांची भेट घेऊन आमदार महादेवराव महाडिक यांना मदत करण्याची विनंती केली. कोरे यांनी त्यांना ठोस आश्वासन न देता दोन दिवसांत सांगू, असे सांगितले आहे.
खासदार महाडिक : प्रा. पाटील यांची भेट
दरम्यान, सोमवारी दुपारी खासदार धनंजय महाडिक व संजय डी. पाटील यांनीही जनसुराज्यचे नेते प्रा. जयंत पाटील यांची भेट घेतली. आपण एकत्र राहूया, असा आग्रह महाडिक यांनी प्रा. पाटील यांच्याकडे धरला. संजय पाटील यांनीही सहकार्याबाबत जयंत पाटील यांना विनंती केली.
विधानसभेच्या ‘आॅफर’ची कागलात चर्चा
रविवारी आमदार महाडिक यांनी मुरगूडला जाऊन मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली; परंतु तिथे त्यांनी संजय मंडलिक यांना विधानसभा निवडणुकीत मदत करू, अशी आॅफर दिली. त्याची जोरदार चर्चा तालुक्यात सोमवारी दिवसभर होती. मंडलिक गटाच्या नगरसेवकांनी महाडिक यांना तुम्ही लोकसभेला मंडलिक यांना पाठिंबा द्या, आम्ही आता सगळी मते तुम्हांला देतो, अशी मागणी केली. त्यावर मात्र महाडिक चांगलेच निरुत्तर झाले. ते माझ्या हातात नाही, त्याचे मला काही सांगता येणार नाही. विधानसभेला मी तुम्हाला मदत करतो, असे सांगण्याचा प्रयत्न महाडिक यांनी केला.