जिल्ह्यात सावकारी पाश आवळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:54 AM2019-04-22T00:54:33+5:302019-04-22T00:54:38+5:30
एकनाथ पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : टक्केवारी व्याजाने कर्जपुरवठा करून तिपटीने व्याज वसूल करणाऱ्या जिल्ह्यातील खासगी सावकारांच्या ...
एकनाथ पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : टक्केवारी व्याजाने कर्जपुरवठा करून तिपटीने व्याज वसूल करणाऱ्या जिल्ह्यातील खासगी सावकारांच्या जाचाला अनेक कुटुंबे बळी पडत आहेत. व्याजापोटी जमीन, घरांसह गाडी अशा स्थावर मालमत्ता जबरदस्तीने नावावर करून त्यांनी कुटुंबीयांना उघड्यावर आणले आहे. शहरासह उपनगरांतील काही सावकार आजही परिस्थितीचा गैरफायदा घेत काही कुटुंबीयांवर अत्याचार करत असल्याचे भयावह चित्र आहे.
रुईकर कॉलनीत राहणाºया उच्चशिक्षित विवाहितेवर तिघा सावकारांनी सामूहिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर शहरात दोन वर्षांपूर्वी असाच हीन वृत्तीचा प्रकार घडला होता. एका प्रतिष्ठित नोकरदार व्यक्तीने घेतलेल्या कर्जाची रक्कम फेडण्यासाठी त्याच्यासोबत त्याच्या पत्नीलाही अशीच हीन प्रवृत्तीची वागणूक देत तिला वाममार्गाला लावण्याचा प्रयत्न एका सावकाराकडून घडला होता. या प्रकरणी शहरातील एका पोलीस ठाण्यात एका सावकारावर गुन्हाही दाखल झाला होता. टिंबर मार्केट, राजाराम चौक येथे व्याजाने घेतलेले पैसे परत न केल्याच्या रागातून खासगी सावकारासह पंधराजणांनी घरात घुसून माय-लेकीस मारहाण केली होती. कळंबा (ता.करवीर) येथे नातेवाइकाची कर्जापोटी गहाण ठेवलेली दुचाकी परत मागितल्याच्या रागातून चौघा सावकारांनी पिता-पुत्रावर लोखंडी गजाने हल्ला केला होता. विम्याचा ३५ कोटी रुपयांचा लाभ मिळविण्याच्या उद्देशाने स्वत:च्या मृत्यूचा बनाव करण्यासाठी सेंट्रिंग कामगाराच्या खूनप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अमोल पवार व भाऊ विनायक यांना अटक केली. या प्रकरणात शहर व उपनगरांतील १२ खासगी सावकारांना अटक झाली.
जगणंच मुश्कील बनलंय; हीन वृत्ती वेळीच ठेचण्याची गरज
खासगी सावकारांनी सर्वसामान्य लोकांना भरमसाट व्याजाने पैसे देऊन, बेकायदेशीर कागदपत्रे लिहून, तसे बँकेचे धनादेश घेऊन बेकायदेशीर व्यवसाय कायदेशीर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रत्येक महिन्यासाठी व्याजवसुली करून दिलेल्या रकमेच्या कितीतरी पटींनी पैसे वसूल केल्यानंतरही गुंडांच्या माध्यमातून ते दहशत निर्माण करत आहेत. या दहशतीमुळे अनेक लोक पोलिसांत तक्रार देण्यास भीतीपोटी येत नाहीत.