सावर्डीतील प्रांजलला मिळाली मायेची ऊब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 01:01 AM2019-01-01T01:01:38+5:302019-01-01T01:01:42+5:30
राजाराम कांबळे। लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : ऐतिहासिक वारसा आणि निसर्गाचे वरदान लाभलेल्या शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी गावात दुसरी मुलगी ...
राजाराम कांबळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : ऐतिहासिक वारसा आणि निसर्गाचे वरदान लाभलेल्या शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी गावात दुसरी मुलगी झाली म्हणून प्रकाश पाडावे व जयश्री पाडावे या निर्दयी माता-पित्याने आपल्या पोटच्या गोळ्याला थिमेट पाजून ठार मारले. मात्र, त्यांची पहिली मुलगी आई-वडिलाविना पोरकी झाली. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत ओम साईराम सेवा ट्रस्ट, नवी मुंबईच्या अध्यक्षा नीता कृष्णा खोत यांनी सामाजिक बांधीलकी मानून नकुशीपायी पोरक्या झालेल्या प्रांजल हिला मायेची ऊब देऊन तिच्या संगोपनाची जबाबदारी घेतली. त्यामुळे समाजात आजदेखील माणुसकी शिल्लक आहे, याची या घटनेने प्रचिती आली.
शासन ‘लेक वाचवा अभियान’ राबविण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे. ‘लेक वाचवा अभियान’ ग्रामीण व शहरी भागात रुजविण्यासाठी शासनस्तरावर अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. मात्र, या सर्वाला छेद देणारी घटना शाहूवाडी तालुक्यात सावर्डी गावात घडली. प्रकाश व जयश्री पाडवे यांना पहिली प्रांजल नावाची मुलगी आहे. दुसरी मुलगी झाली म्हणून या दोन निर्दयी माता-पित्याने मुलीला विषारी औषध पाजून ठार मारले.
माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्यामुळे संपूर्ण शाहूवाडी तालुक्यात खळबळ उडाली. मात्र, प्रकाश व जयश्री पाडवे यांची पहिली मुलगी पोरकी झाली. प्रांजल हिचे आजोबा बंडू पाडावे यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. गुºहाळघरावर कामाला जाऊन कुटुंबांचा उदरनिर्वाह केला जातो.
हे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत नवी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या नीता खोत यांनी पोरक्या झालेल्या प्रांजलचे संगोपन, तसेच शालेय शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे.
ट्रस्टने कुटुंबाची जबाबदारी घेतली
नीता खोत यांनी सावर्डी गावात जाऊन प्रांजलेचे आजोबा बंडू पाडावे, आजी आकुबाई पाडावे यांची भेट घेतली. प्रांजलची व त्या कुटुंबाला लागणाऱ्या सर्व खर्चाची जबाबदारी घेतली. प्रांजल सज्ञान होईपर्यंत संपूर्ण खर्च ओम साईराम सेवा ट्रस्ट करणार आहे. या ट्रस्टने संसारोपयोगी साहित्य, मुलीला कपडे, मुलीच्या आजीला साडी, खाऊ, गहू, तांदूळ, साखर, तेल, आदी साहित्य दिले. या कुटुंबाला महिन्याला लागणारा खर्च ट्रस्ट करणार आहे.