प्रवाशांचे जीव वाचवले, पण आमच्या नोकरीचे काय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:25 AM2021-07-29T04:25:20+5:302021-07-29T04:25:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर: चोहोबाजूंनी बस महापुरात वेढलेली असतानाही बसमधील सर्व २५ प्रवाशांना त्यांनी प्रसंगावधान राखत सुखरुप बाहेर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर: चोहोबाजूंनी बस महापुरात वेढलेली असतानाही बसमधील सर्व २५ प्रवाशांना त्यांनी प्रसंगावधान राखत सुखरुप बाहेर काढले, पण आता ते स्वत:च अडचणीत सापडले आहेत. गाडी पाण्यात घातली म्हणून कारवाई होण्याची आणि नोकरी जाण्याची भीती महापुरापेक्षाही अधिक छळत आहे. महापुरात पाच दिवस राहून जेवढी वाटली नाही, तेवढी भीती आता नोकरी जाण्याची आणि कुटुंब उघड्यावर पडण्याची वाटत असल्याने ते गलीतगात्र झाले आहेत.
ही घटना आहे, २३ जुलैच्या मध्यरात्रीची. दीडच्या सुमारास चालक श्रीशैल बोळेगाव व वाहक अब्बासअली मुल्ला यांनी विजापूर ते रत्नागिरी ही बस पंचगंगा पुलावरुन मार्गस्थ केली. धो धो पाऊस कोसळत असल्याने पाण्याचा अंदाज आला नाही. आंबेवाडीनजीक रस्त्यावर पाणी आल्याचे पाहून त्यांनी जागेवरच गाडी थांबवत तातडीने १०० नंबरकडे मदतीची याचना केली. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी अर्ध्या तासातच तरुणांना मदतीसाठी पाठवले. तोपर्यंत गाडी चोहोबाजूंनी पुराने वेढली होती. अशातच गाडी मागे घेत, रोप लावत यातील २५ प्रवाशांना सुखरुप बाहेर काढेपर्यंत पहाटेचे साडेचार वाजले होते. प्रवासी सुखरुप बाहेर पडले मात्र चालक, वाहकांना गाडी सोडता येत नसल्याने तेथेच थांबून राहिले. त्यांनी डेपोशी संपर्क केला पण गाडी तुम्हीच घेऊन या असा निरोप दिल्याने हतबल झालेले हे दोघे तेथे पुलाच्या कठड्यावर बसून राहिले. पुराच्या पाण्यात अडकलेल्या या दोघांनी कोल्हापूरकरांमधील माणुसकीचा अनुभव घेतला. त्यांना अन्न पाणी देण्याबरोबरच कपडेही देऊ केले. हे पाहून त्यांच्याही डोळ्यात अश्रू तरळले.
बुधवारी पाणी पूर्णपणे ओसरल्यानंतर ही बस संभाजीनगर डेपोमध्ये आणण्यात आली. तातडीने मदत पाठवली आणि जीव वाचवला म्हणून या दोघांनी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांची भेट घेऊन आभार मानले. पण हे सर्व करत असताना त्यांना भविष्याची चिंता मात्र सतावू लागली आहे. नोकरीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असल्याने ती गेली तर काय या चिंतेने ते गलीतगात्र झाले आहेत. पावसाचा व पाण्याचा अंदाज न आल्याने गाडी पुढे नेली, पण कोणतीही जीवितहानी होऊ दिली नाही, याचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा अशी त्यांची अपेक्षा आहे.
फोटो: २८०७२०२१-कोल-कर्नाटक ड्रायव्हर
फोटो ओळ: कर्नाटक आगाराची बस महापुरात अडकल्यानंतर सर्व प्रवाशांची सुटका केल्यानंतर चालक, वाहक असेच पाण्यात बसून होते.
(छाया: आदित्य वेल्हाळ )