बचत हा स्त्रियांचा नैसर्गिक स्वभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 12:38 AM2019-09-04T00:38:31+5:302019-09-04T00:38:36+5:30

भारत पाटील पंचायत समिती पन्हाळ्याच्या सर्वच अधिकारी व पदाधिकारी यांच्या परिश्रमामुळे २००० स्वयंसहाय्यता महिला बचत गटांचा टप्पा आम्ही अल्पकाळातच ...

Saving is the natural nature of women | बचत हा स्त्रियांचा नैसर्गिक स्वभाव

बचत हा स्त्रियांचा नैसर्गिक स्वभाव

Next

भारत पाटील
पंचायत समिती पन्हाळ्याच्या सर्वच अधिकारी व पदाधिकारी यांच्या परिश्रमामुळे २००० स्वयंसहाय्यता महिला बचत गटांचा टप्पा आम्ही अल्पकाळातच पार केला होता. या सर्व बचत गटांना बँकेशी जोडणे आवश्यक होते. यासाठी समन्वयक, पालक, अधिकारी व सर्व प्रतिनिधींशी सतत संवाद व पाठपुरावा सुरू होता. के.डी.सी.सी. बँक व राष्ट्रीयीकृत बँका यांना बचत गट जोडण्यामध्ये आम्हाला यश मिळाले होते. या बचत गटांना पुढील वाटचालीसाठी त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता होती. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यासाठी मार्गदर्शन करीत होती. पन्हाळा तालुक्यातील प्रत्येक बचत गटातील महिलांना सविस्तर मार्गदर्शन देण्याबाबत आम्ही एक कृती आराखडा तयार केला होता. या कृती आराखड्यामध्ये बीटनिहाय व गावपातळीवर सर्वच महिलांना एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणामध्ये बचत गटाने १. बँकेशी व्यवहार कसा करावा, २. गटातील व्यवहाराचे दप्तर व हिशेब कसा ठेवावा, ३. बचत गटाची मासिक सभा कधी घेण्यात यावी, ४. गटातील महिला सभासदांना कर्ज वितरण कसे करावे, ५. मासिक वर्गणी व कर्जाचा हप्ता याची परतफेड व या सर्व व्यवहारांचा हिशेब, ६. अध्यक्ष व सचिव यांची जबाबदारी, या वरील मुद्द्यांवर विस्तृतपणे प्रशिक्षण दिले होते. प्रशिक्षणासाठी जिल्हा ग्रामीण यंत्रणा, नाबार्ड व बँक प्रतिनिधी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले होते. विस्तार अधिकारी एन. के. पाटील व त्यांचे सहकारी याबाबत उत्तम नियोजन करीत होते.
बचत गटाच्या प्रशिक्षणानंतर पुढे त्यांना रचनात्मक व व्यवसायात्मक बाबींविषयी सविस्तर व अभ्यासू मार्गदर्शनाची आता गरज निर्माण झाली होती. स्त्रियांमध्ये बचत हा जन्मत:च गुण असल्यामुळे व महिलांचं एक वेगळं व्यासपीठ महिलांना मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये जिज्ञासू भावना तयार होत होती. आम्हाला एखादा व्यवसाय सूचवा, आम्ही महिलांनी बचत गट स्थापन केला आहे, आता आम्ही पुढे काय करायचे? याबाबत सतत महिलांमधून विचारणा होत होती.
पन्हाळा तालुक्याने नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. महिला बचत गटांबाबत आपणाला नवीन काय करता येईल हा विषय मी अंगणवाडीच्या सेविका व मदतनीस यांच्यामध्ये चर्चेला घेतला होता. अनेक महिला भगिनींनी सांस्कृतिक कार्यक्रम, हळदी-कुंकू, गटाचे कर्ज वितरण, बचत गटांना व्यावसायिक प्रशिक्षण व महिलांचे स्नेहसंमेलन असे अनेक विषय सुचविले होते. त्यानुसार आम्ही पन्हाळा येथे तालुक्यातील बचत गटांतील महिलांचा रणरागिणी ताराराणी महिला महोत्सव आयोजित करण्याचे ठरविले होते. या महोत्सवामध्ये तांदूळ महोत्सव, खाद्य महोत्सव व विविध गुणदर्शन असा कार्यक्रम निश्चित केला होता. या कार्यक्रमासाठी देशाचे व राज्याचे ग्रामविकासमंत्री यांना बोलाविण्याचे प्रयोजन केले होते. त्यावेळी खासदार निवेदिता माने यांच्याद्वारे ग्रामविकासमंत्री सूर्यकांता पाटील यांच्या भेटीसाठी मी, सरपंच प्रकाश पाटील, शाहू काटकर व नगराध्यक्ष विजय पाटील दिल्लीला गेलो होतो. खासदार माने वहिनी यांच्यासोबत सूर्यकांता पाटील यांना भेटून कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. त्यांनीही हे निमंत्रण आनंदाने स्वीकारले होते. त्यांचे पी. ए. अंकुश चव्हाण यांच्याशी चर्चा करून आम्हाला त्यांनी तत्काळ तारीख दिलेली होती.
कार्यक्रमाचे नियोजन आम्ही नेटके केले होते. सुमारे दहा हजार महिलांची उपस्थिती होती. तांदूळ महोत्सव, खाद्य महोत्सव व विविध गुणदर्शन या कार्यक्रमांमुळे महिलांमध्ये नवचैतन्य संचारले होते. खासदार माने वहिनी यांनी महिलांचा जागर याविषयी उत्तम मार्गदर्शन केले होते. मंत्री सूर्यकांताताई बोलताना सर्वजण चकीत झाले होते. त्यांच्या जिभेवर साक्षात आई सरस्वतीचा वास आहे की काय? असे वाटत होते. स्त्रीचा जन्म, नारीशक्ती, स्त्रियांमधील सहनशीलता, स्त्रीची बचत, स्त्रीची आई, बहीण व पत्नी या भूमिका व स्त्रीचे आदिशक्तीरूप याविषयी खड्या सुरामध्ये त्यांनी मार्गदर्शन केले होते. आम्ही सगळे भारावून गेलो होतो. मी माझ्या मनोगतामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांचे अधिकार वाढविणे व १२ वा वित्त आयोग पंचायत समितीला मिळावा याबद्दल आग्रही भूमिका मांडली होती. त्यावेळी मल्हारपेठ ते पणोरे व कणेरी-गवळीवाडा या रस्त्याची खूपच दुरवस्था होती. खड्ड्यांचा रस्ता की रस्त्यांचे खड्डे इतकी बिकट परिस्थिती होती. आम्ही पंचायत समितीच्या वतीने सीताराम सातपुते, गणपती कांबळे, डॉ. जानकर यांच्या हस्ते सूर्यकांतातार्इंना वरील कामाविषयी निवेदन दिले होते. महिलांची मोठी उपस्थिती व उत्साह बघून सूर्यकांतातार्इंनी कार्यक्रमातच या कामांची घोषणा केली होती. कार्यक्रमानंतर काही दिवसांनी त्यांचा पी.ए. अंकुश चव्हाण यांचा मला फोन आला की, तुमची दोन्ही रस्त्यांची (१ कोटी निधीची) कामे मंजुरीमध्ये आहेत, पुढील पाठपुरावा करावा. अशा कार्यतत्पर लोकप्रतिनिधीमुळे मला खूप काही शिकायला मिळाले.
(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्ती चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते आहेत.)

Web Title: Saving is the natural nature of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.