भरधाव एस.टी.च्या धडकेत वृद्धा ठार

By admin | Published: April 26, 2015 01:12 AM2015-04-26T01:12:05+5:302015-04-26T01:12:05+5:30

मध्यवर्ती बसस्थानकातील घटना : घराला आग लागल्याच्या काळजीने परतताना काळाचा घाला; संतप्त नातेवाइकांची एसटीवर दगडफेक

Savings kill the oldest ST | भरधाव एस.टी.च्या धडकेत वृद्धा ठार

भरधाव एस.टी.च्या धडकेत वृद्धा ठार

Next

गांधीनगर/कोल्हापूर : वेळ काही सांगून येत नसते याचा प्रत्यय गांधीनगर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या संकाजी कुटुंबीयास आला. घराला आग लागल्याचे समजताच परगावाहून येत असता राधाबाई गुराप्पा संकाजी (वय ६५, रा. गांधीनगर झोपडपट्टी) यांचा अपघाती मृत्यू कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात झाला. हा अपघात शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. यावेळी संतप्त नातेवाइकांनी बसवर दगडफेक केली.
याबाबत घटनास्थळ व नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार : गांधीनगर रेल्वेस्थानकानजीक शिवाजी मार्केट आहे. मार्केटलगतच राधाबाई संकाजी यांचे घर आहे. त्यालगत पंडित चव्हाण यांचे वेस्ट पेपर डिलर्सचे मोठे गोदाम आहे. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास रद्दी गोदामाला अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने लगतच्या राधाबाई यांच्या घराला आग लागली. त्या दोन दिवसांपूर्वी गावी गेल्या होत्या. परिसरातील लोकांनी तत्काळ महापालिकेच्या अग्निशामक दलास पाचारण केले, परंतु रद्दी गोदाम व राधाबाई यांचे घर जळून खाक झाले. या आगीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने २० ते २५ फूट टाकी उडून गेली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या आगीची झळ मोहन कारंडे यांच्या घराला लागल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले. पंडित चव्हाण यांचे पाच ते सहा लाखांचे, राधाबाई संकाजी यांचे तीन लाखांचे असे एकूण दहा लाखांचे नुकसान झाले.
त्याचवेळी गांधीनगर येथील घर जळाल्याचा निरोप मिळताच चंदगड येथील आजारी मेहुण्याला पाहून घरी परतत असताना राधाबाई गुराप्पा संकाजी यांना दुपारी साडेबारा वाजता मध्यवर्ती बसस्थानक येथे भरधाव एस. टी. बसने चिरडले. यावेळी संतप्त नातेवाइकांनी बसवर दगडफेक केली.
राधाबाई संकाजी या चंदगड येथील आजारी नातेवाइकाला पाहण्यासाठी शुक्रवारी सकाळी गेल्या होत्या. दरम्यान, त्याच रात्री त्यांचे घर जळीत झाल्याने शनिवारी सकाळी त्या नातू रोहित अनिल दुगदाळे याला घेऊन एस.टी.ने कोल्हापुरात आल्या. मध्यवर्ती बसस्थानक येथे एस.टी.मधून उतरून त्या नातवाच्या हाताला धरून बाहेर जात असताना भरधाव कोल्हापूर-पुणे विनावाहक एस.टी. बसने त्यांना जोराची धडक दिली. त्यामध्ये त्या खाली पडून पुढच्या चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाल्या. यावेळी त्यांचा नातू रोहित बाजूला फेकला गेल्याने सुदैवाने बचावला. वृद्धा गाडीखाली सापडल्याने आजूबाजूच्या प्रवाशांनी आरडाओरड केली. यावेळी प्रवाशांनी मोठी गर्दी केली. या घटनेची माहिती नातेवाइकांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. राधाबाई यांचा मृतदेह पाहून संतप्त नातेवाइकांनी एस. टी. बसवर दगडफेक करून काचा फोडल्या. अपघाताची वर्दी मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघातस्थळाचा पंचनामा करून मृतदेह सीपीआरमध्ये पाठविला. यावेळी नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. राधाबाई यांच्या पतीचे दहा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

Web Title: Savings kill the oldest ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.