सावित्रीबाई फुले रुग्णालय : सुविधा वाढल्या; रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 01:07 PM2019-03-21T13:07:04+5:302019-03-21T13:09:26+5:30
लाखो रुपये खर्चून अत्याधुनिक यंत्रसामग्री बसवून महानगरपालिकेचे सावित्रीबाई फुले रुग्णालय सुसज्ज करण्यात आले. अवघ्या चार महिन्यांतच येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढली. येथे रोज किमान सुमारे २०० हून अधिक रुग्णांवर उपचार केले जातात, तर किमान तीन शस्त्रक्रिया होतात शिवाय महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रोज किमान ५ ते ६ रुग्णांवर मोफत उपचार येथे होतात. त्यामुळे हे रुग्णालय अनेकांचा आधारवड बनत आहे.
तानाजी पोवार
कोल्हापूर : लाखो रुपये खर्चून अत्याधुनिक यंत्रसामग्री बसवून महानगरपालिकेचे सावित्रीबाई फुले रुग्णालय सुसज्ज करण्यात आले. अवघ्या चार महिन्यांतच येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढली. येथे रोज किमान सुमारे २०० हून अधिक रुग्णांवर उपचार केले जातात, तर किमान तीन शस्त्रक्रिया होतात शिवाय महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रोज किमान ५ ते ६ रुग्णांवर मोफत उपचार येथे होतात. त्यामुळे हे रुग्णालय अनेकांचा आधारवड बनत आहे.
महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात सोयी-सुविधा वाढल्या. सहा बेडचे सुसज्ज अतिदक्षता विभाग (आयसीयू), व्हेंटिलेटर सुविधा, सोनोग्राफी सेंटर, गरोदर माता अत्याधुनिक कक्ष, अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग, इलेक्ट्रो लाईट अॅनालायझर मशीन आदी अत्याधुनिक मशिनरीद्वारे रुग्णालय सुसज्ज केले. त्यामुळे रुग्णालय रुग्णसेवेसाठी दर्जेदार बनले आहे.
रुग्णसंख्या; जमा रकमेच्या भरणेत वाढ
चार महिन्यांपूर्वी केसपेपर अथवा रुग्णांच्या बिलाची रक्कम रोज सुमारे १५ हजार रुपयांपर्यंत जमा होत होती; पण रुग्णसेवा सुसज्ज केल्यानंतर आता हीच रक्कम सुमारे ४० हजारांपर्यंत जमा होत आहे. यापूर्वी रोज १०० रुग्णांवर उपचार होत होते, आता २०० हून अधिक रुग्णांवर उपचार होतात.
बायो केमिस्ट्री अॅनालायझर मशीन पाच वर्षांनंतर सुरू
रुग्णांचे किडनी, लिव्हरची तपासणीचे बायो केमिस्ट्री अॅनालायझर मशीन दहा वर्षांपूर्वी खरेदी केले होते; पण ते चालविण्यासाठी तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याने ते पाच वर्षे बंद होते. आता ते दुरूस्त केले असून दोन दिवसांत सेवेत सज्ज होत आहे.
डॉक्टर, कर्मचाऱ्यांची कमतरता
११ डॉक्टरांची पदे कायम मंजूर असताना फक्त चारच डॉक्टरांसह व ३५ शिकाऊ डॉक्टरांवर हे रुग्णालय सेवा बजावत आहे शिवाय सिस्टर २२ (मंजूर ४० पदे), वॉर्डबॉय १४ (मंजूर पदे २८), वॉचमन ६ (मंजूर पदे १४), ड्रेसर ३ (मंजूर पदे ५) असा कर्मचाऱ्यांचा डोलारा आहे.
सुविधा व योजना...
१) ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी, कर्करोग्यांना पूर्ण उपचार तर अपंगांना ५० टक्के मोफत उपचार आहेत.
२) महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत केशरी आणि पिवळी रेशनकार्डधारकांसाठी २५० आजारांवर मोफत उपचार.
३) अतिदक्षता विभागाचे रोज ४०० रुपये भाडे
४) ज्येष्ठ नागरिक, कर्मचाऱ्यांसाठी सोनोग्राफी तपासणी २०० रुपये
५)गर्भवती माता : प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला रुग्णालयात दाखल होणाऱ्या गर्भवती महिलेची प्रधानमंत्री मातृत्व योजनेद्वारे प्रसुती व उपचार मोफत, इतर दिवशी सर्व तपासण्या फक्त २०० रुपयांत, प्रसुतीसाठी दाखलपासून डिस्चार्र्जपर्यंत रोज दोनवेळचे भोजन व प्रोटिन पावडर मोफत. जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमांत घर ते रुग्णालय ने-आणची मोफत सुविधा. दर बुधवारी आॅनलाईन नोंदणी व फक्त ३५ रुपयांत सर्व तपासण्या मोफत.
सावित्रीबाई फुले रुग्णालय अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज केले आहे. त्यामुळे रुग्णांचा ओघ वाढला, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची रिक्तपदे निवडणुकीनंतर भरू, आणखी रुग्णवाहिकेची तरतूद केली आहे. रुग्णांचे प्लेटलेट मोजण्याचे सेल कौंटर मशीनही लवकरच सेवेत दाखल होईल.
- डॉ. दिलीप पाटील,
मुख्य आरोग्याधिकारी, कोमनपा.