‘गुगल’ने उलगडला सावित्रीबार्इंचा जीवनपट!

By admin | Published: January 3, 2017 11:25 PM2017-01-03T23:25:33+5:302017-01-03T23:25:33+5:30

अनोखी आदरांजली : देशभरातील कोट्यवधी नेटीझन्स्ची लिंकला भेट; जिल्हावासीयांना सार्थ अभिमान

Savitribaiya Bipolar! | ‘गुगल’ने उलगडला सावित्रीबार्इंचा जीवनपट!

‘गुगल’ने उलगडला सावित्रीबार्इंचा जीवनपट!

Next

सातारा : आयुष्यभर हालअपेष्टा सहन करून महिलांसाठी शिक्षणाची कवाडं उघडून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची मंगळवारी जयंती होती. यानिमित्ताने गुगलने डूडलवर सावित्रीबार्इंचा जीवनपट उलगडून अनोखी आदरांजली वाहिली. देशभरातील कोट्यवधी नेटीझन्सनी या लिंकला भेट दिली आहे.
गुगल हे प्रत्येकाच्या जीवनाचा एक घटक बनले आहे. प्रत्येक गोष्टीची माहिती घेण्यासाठी सहज गुगलला भेट दिली जाते. मात्र, याच गुगलने सावित्रीबार्इंच्या जन्मदिनी डूडलवरून आदरांजली वाहिली आहे. डूडलच्या खाली एक लिंक दिली आहे. या लिंकवर क्लिक केल्यावर सावित्रीबार्इंच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना सचित्र दिल्या आहेत.
भारतातील आद्य मुख्याध्यापिका, आद्य शिक्षिका, समाजसुधारक म्हणून सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणादायी आहे. उपेक्षित महिलांचे शिक्षण व अन्याय, अत्याचार, अनिष्ठ रुढींच्या विरोधात अखंड संघर्ष करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगावात झाला.
महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे जनक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा जोतिराव फुले यांच्या सोबत सावित्रीबार्इंचा १८४० मध्ये विवाह झाला. ते मिशनऱ्यांच्या शाळेत इंग्रजी शिकले होते. शिक्षणामुळे झालेल्या जागृतीने समाजातील तीव्र विषमतेचे प्रखर भान येऊन त्यांनी आपले जीवन तळागाळातील जनतेचे शैक्षणिक परिवर्तन व त्यांचा सामाजिक पातळीवर उद्धार करण्यासाठी खर्ची घालायचे ठरविले. सावित्रीबार्इंनी जोतिरावांच्या बरोबरीने समाजसेवेचा वसा घेतला. मुलींनी शिकावे म्हणून त्यांनी शाळा सुरू केल्या. त्यांच्या या सुधारणेच्या कामावर त्यांच्या कुटुंबाची वाईट प्रतिक्रिया आली. त्यांचा परिणाम संबंध तोडण्यावर झाला. समाजानेही फुले दाम्पत्याच्या पुरोगामी पणासाठी अतिशय छळ केला. परंतु फुले दाम्पत्य थोडे देखील आपल्या ध्येयापासून विचलित झाले नाहीत. कारण त्यांनी सामाजिक क्रांतीचे कार्य हे जाणीवपूर्वक अंगीकारले होते. त्यांच्या जीवनाचा तो एक भाग झाला होता.
जोतिरावांच्या शिक्षण कार्यात सहकार्य करण्यासाठी सावित्रीबाई प्रथम स्वत: शिकल्या, अध्यापनाचे धडे घेतले. त्यानंतर शाळांचे व्यवस्थापन आणि अध्ययन करू लागल्या. स्त्री शिक्षणाचे कार्य त्यांनी चांगल्या प्रकारे पुढे नेले. त्यांनी कामगारांसाठी रात्रशाळा काढल्या. तेथेही देवदासी पद्धत बंद करणे, बालविवाहाला बंदी करणे, केशवपनाची पद्धत बंद करणे, विधवा विवाहाला असलेल्या बंदीविरुद्ध सामाजिक जागृती करणे आदींच्या परिवर्तनासाठी त्यांनी सामाजिक जागृती केली. त्यांनी समाजप्रबोधन करण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कविता रचल्या.
त्यांच्या काव्याचे विषय सामाजिक आहेत. त्यात जातीभेद निर्मूलन, स्त्री शिक्षणाचे महत्त्व, विधवा विवाह, बालविवाह, शूद्रा अतिशूद्रांसाठी शिक्षण देत होते.
सावित्रीबाई समाज प्रबोधन व समाज जागृतीसाठी सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत गद्य, पद्य, पत्रे, भाषणे आणि गाणी आदींच्या माध्यमातून विचार मांडलेत. उपेक्षित स्त्रिया, कामगार आणि समाजातील खालच्या स्तरातील घटकांना अज्ञान व दारिद्र्याच्या अंधारातून बाहेर काढणे, त्यांना स्वाभिमान व स्वावलंबी बनविणे, त्यांच्यावर होणारे सामाजिक अन्याय, अत्याचार दूर व्हावेत, अंधश्रद्धा, रुढी नष्ट होऊन त्यांच्यात विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनातून निर्माण व्हावा. यासाठीच सावित्रीबार्इंनी देह व लेखणी झिजविली.
१८९६-९७ दरम्यान पुणे व परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेत होता. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थलांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबार्इंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेग रुग्णांची सेवा करताना सावित्रीबार्इंनाही प्लेग रोगाची लागण झाली. या रोगामुळे १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले. (प्रतिनिधी)
मीडियावरही चर्चा
सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकवरून आदरांजली वाहिली जात होती. अनेकांनी ‘डूडल’चा फोटो काढून एकमेकांना ‘शेअर’ केला. त्यामुळे दिवसभरात कोट्यवधी लोकांनी या लिंकला भेट देऊन माहिती जाणून घेतली.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य महान आहे. जयंतीदिनी त्यांच्या कार्याची माहिती गुगलद्वारे संपूर्ण जगभर पसरली आहे. नायगाव येथील त्यांच्या घरातील व्यक्ती म्हणून याचा सार्थ अभिमान वाटतो. यामुळे नायगावला अधिक महत्त्व प्राप्त होईल.
- सुधीर नेवसे, नायगाव
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे नायगाव हे आज जगाच्या नकाशावर पोहोचले. खरंतर त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन सर्वजण येथून जातात. त्यामुळे नायगावला ‘चेतनाभूमी’ म्हणून संबोधले जाते. गुगलमुळे आता याचा अधिक प्रसार होईल.
- राजेंद्र नेवसे, अध्यक्ष, महात्मा फुले समता परिषद

Web Title: Savitribaiya Bipolar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.