सावित्रीच्या लेकींसाठी ‘कन्यादान साडी’
By admin | Published: March 24, 2015 08:03 PM2015-03-24T20:03:00+5:302015-03-25T00:48:22+5:30
मुलींचा जन्मदर वाढीसाठी प्रयत्न : पोर्ले येथील उदय समूहाकडून आगळावेगळा उपक्रम
सरदार चौगुले - पोर्ले तर्फ ठाणे -पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथील उदय समूहाने लग्नाच्या बोहल्यावर चढणाऱ्या मुलीला ‘कन्यादान साडी’च्या माध्यमातून माहेरचा आहेर देण्याचा उपक्रम या वर्षीपासून सुरू केला आहे. समाजाच्या ऋणातून थोडेफार का होईना उतराई म्हणून हा उपक्रम समूहापुरता मर्यादित न ठेवता गावातील प्रत्येक लेकींसाठी तो राबविला जाणार आहे.‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या भारत सरकारच्या उपक्रमातून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये गावाकडील स्थानिक स्वराज्य संस्थासुद्धा मागे नाहीत. काही संस्थांनी सभासदांच्या कुटुंबात मुलगी जन्मली, तर तिच्या नावे ठेव पावत्या ठेवण्याची योजना राबविली आहे. याच धर्तीवर हा उपक्रम सुरू केला आहे.घराण्याचा वंश म्हणून मुलग्याकडे पाहिले जाते. त्यामुळे प्रत्येक दांपत्याला मुलगीपेक्षा मुलगाच हवा असतो. या भावनेमुळे देशात दर हजारी मुलींचे प्रमाण घटत आहे. याचे गांभीर्य ओळखून मुलींचा जन्मदरवाढीसाठी पोर्ले येथील उदय समूहाच्या वार्षिक सभेत अंगद चौगुले या कार्यकर्त्याने समूहाच्यावतीने मुलींसाठी ‘कन्यादान साडी’ देण्याचा उपक्रम राबवावा, अशी मागणी केली. या मागणीला सर्वांनीच मंजुरी दिली. परंतु, हा उपक्रम समूहापुरता मर्यादित न ठेवता गटनेते परशराम खुडे यांनी हा उपक्रम गावातील प्रत्येक मुलीसाठी राबविण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत गावातील दहा-बारा मुलींना दीड हजार किमतीची ‘कन्यादान साडी’आहेर म्हणून दिली आहे. यासाठी समूहातील काही हौशी कार्यकर्ते स्वखुशीने रक्कम जमा करतात. तालुक्यातून असा आगळावेगळा उपक्रम राबवून ‘लेक वाचवा’ या उपक्रमाला हातभार लावल्याने मुलीच्या आई-वडिलांकडून व तालुक्यातून उदय समूहाच्या या उपक्रमाबद्दल ऋणात्मक कौतुक
होत आहे.
गावात सहकारी संस्थांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले आहेत. सामाजिक ऋणातून उतराई होण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी सूचविलेल्या उपक्रमाला साथ दिली. गावातील गटातटाचा विचार न करता माझ्या संस्थेचा सभासद गावाच्या कानाकोपऱ्यात विस्तारलेला आहे. त्यामुळे हा उपक्रम न ठेवता सर्वांसाठी खुला ठेवला आहे. - परशराम खुडे, गटनेते