सत्तेच्या सारीपाटात ‘सावकरां’चा दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:32 AM2018-12-31T00:32:39+5:302018-12-31T00:33:00+5:30

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : दोन्ही कॉँग्रेस आणि शिवसेना-भाजप या बड्या राजकीय पक्षांशी सौहार्दाचे संबंध ठेवत, ...

Sawakaran's suppression in the alliance of power | सत्तेच्या सारीपाटात ‘सावकरां’चा दबदबा

सत्तेच्या सारीपाटात ‘सावकरां’चा दबदबा

Next

राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दोन्ही कॉँग्रेस आणि शिवसेना-भाजप या बड्या राजकीय पक्षांशी सौहार्दाचे संबंध ठेवत, माजी मंत्री विनय कोरे यांनी जिल्ह्याच्या महत्त्वाच्या पदांवर आपल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचे कसब दाखविले आहे. जिल्हा परिषद, बाजार समिती, शेतकरी संघ, पन्हाळा व हातकणंगले पंचायत समिती सभापती अशी सहा पदे ‘जनसुराज्य’च्या ताब्यात घेऊन पन्हाळा-शाहूवाडी व हातकणंगले मतदारसंघांची बांधणी भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभेच्या तोंडावर सत्तेच्या सारीपाटात आघाडी व युतीपेक्षा ‘जनसुराज्य’च वरचढ ठरल्याचे चित्र दिसत आहे.
राष्टÑवादीशी फारकत घेत २००४ ला कोरे यांनी ‘जनसुराज्य’ची स्थापना केली. स्थापनेच्या वर्षातच तब्बल चार आमदार निवडून आणून कॅबिनेट मंत्रिपद पदरात पाडून घेत कोरे यांनी दमदार एंट्री केली; पण २००९ पासून पीछेहाट होऊन २०१४ ला त्यांचा अवघ्या २८८ मतांनी पराभव झाला. हा पराभूत झाल्यापासूनच ज्यांनी विधानसभेला उघड आणि अंतर्गत टांग मारली, त्यांचे जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीपासून उट्टे काढण्यास सुरुवात केली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रस्थापित पक्षांनी हवा केली असताना सहा जागा निवडून आणून विनय कोरे राजकारणातून संपलेले नाहीत, हे दाखवून दिले.
विधानसभा सोपी करायची झाल्यास कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे. जिल्हा परिषदेत सहा सदस्य असतानाही भाजपशी समझोता करून ‘बांधकाम’ व ‘समाजकल्याण’ ही दोन सभापतिपदे स्वत:कडे घेतली. शाहूवाडीत विरोधकांना शह देण्यासाठी बांधकाम सभापतिपदी जिल्हा बॅँकेचे संचालक सर्जेराव पाटील पेरिडकर यांना संधी दिली. दरम्यानच्या काळात विक्री झालेला दत्त-आसुर्ले साखर कारखाना पुनरुज्जीवित करून तिथे कार्यकर्त्यांची वर्णी लावली. कॉँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी असलेल्या शेतकरी संघाच्या अध्यक्षपदी अमरसिंह माने (भादोले) यांची वर्णी लावून हातकणंगले मतदारसंघात राजीव आवळे यांना ताकद दिली. त्यानंतर झालेल्या बाजार समिती सभापतिपद रोटेशनने आमदार सतेज पाटील गटाकडे जाणार होते; पण कोरे त्यासाठी आग्रही राहिले आणि शाहूवाडीचे बाबासाहेब लाड यांची सभापतिपदी वर्णी लावली. गेल्या वेळेला सरुड (सत्यजित पाटील यांचे गाव) मधील मताधिक्यच कोरे यांच्या पराभवास कारणीभूत ठरले होते. स्थानिकचा उमेदवार असल्याने त्या गावात फारसे हाताला लागणार नाही, म्हणूनच तेथील मताधिक्य भरून काढण्यासाठी लाड यांच्या रूपाने चरण गावची मदत घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हातकणंगले पंचायत समिती सभापतिपदही सरितादेवी मोहिते यांच्या रूपाने ‘जनसुराज्य’कडेच घेतले. जिल्हा व तालुका पातळीवरील सर्वाधिक पदे सध्या जनसुराज्यकडेच अधिक आहेत.

सत्तेच्या केंद्रस्थानी सावकरच
जनसुराज्य जिल्हा बॅँक, बाजार समिती व शेतकरी संघात कॉँग्रेस, राष्ट्रवादीसोबत तर जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेना-स्वाभिमानीशी आघाडी करीत सत्तेत सहभागी आहे. एकूणच जिल्ह्याच्या सत्तेच्या केंद्रस्थानी पुन्हा विनय कोरेच राहिले आहेत.

Web Title: Sawakaran's suppression in the alliance of power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.