सांग सांग भोलानाथ पाऊस थांबेल का, पावणे तीन महिने एक सारखा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 04:13 PM2018-08-21T16:13:36+5:302018-08-21T16:16:08+5:30
सततच्या पावसाने पिकांची मूूळे कमकुवत झाली असून सुर्य प्रकाशाविना अन्न निर्मिती मंदावल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे ‘सांग सांग भोलानाथ पाऊस थांबेल का’ अशी विचारण्याची वेळ सर्वांवर आली आहे.
कोल्हापूर : गेले पावणे तीन महिने कोल्हापूर जिल्ह्यात एक सारखा पाऊस सुरू आहे. सरासरीच्या आतापर्यंत तब्बल ७७ टक्के पाऊस झाला तरी पाऊस थांबण्याचे नाव घेईना. संततधार पावसाने माणसांसह पशु-पक्षी कंटाळली आहेत. सततच्या पावसाने पिकांची मूूळे कमकुवत झाली असून सुर्य प्रकाशाविना अन्न निर्मिती मंदावल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे ‘सांग सांग भोलानाथ पाऊस थांबेल का’ अशी विचारण्याची वेळ सर्वांवर आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ‘उन्हाळा’, ‘हिवाळा’ व ‘पावसाळा’ हे तिन्ही ऋतु तसे जेमतेम असतात. कडक उन्हाळा, गोठवणारी थंडी आणि अतिवृष्टी या तिन्ही गोष्टी फारशा अनुभवायास येत नाहीत. जिल्ह्यात पाऊस जास्त पडत असला तरी पावसाचे एखादे नक्षत्र जास्त बरसले तर दुसरे कोरडे जाते. त्यामुळे माणसांना थोडी उसंत मिळते आणि पिकांना वापसा मिळतो.
पिकांना सुर्यप्रकाश मिळाल्याने वाढ जोमात होऊन खरीपाचे उत्पादनही चांगले मिळते. पण यावर्षी मान्सूनची लहर काही वेगळीच आहे. यंदा ८ जून ला ‘मृग’ नक्षत्र सुरू झाले असले तरी जूनच्या दोन तारखेपासूनच पावसाची भुरभुर सुरू झाली होती. त्यानंतर तीन-चार दिवसाचा अपवाद वगळता सर्वच नक्षत्र काळात जोरदार पाऊस झाला आहे.
साधारणता पुनर्वसू (तरणा पाऊस) आणि ‘पुष्य’ (म्हातारा पाऊस) काळातच आपल्याकडे जोरदार वृष्टी होते. पण गेले पावणे तीन महिने कमी-अधिक प्रमाणात का असेना पण पाऊस थांबलेलाच नाही. आता पर्यंत जिल्ह्यात १६५०० मिली मीटर पाऊस कोसळला आहे. वार्षिक सरासरीच्या तब्बल ७७ टक्के पाऊस पावणे तीन महिन्यातच झाला आहे.
पावसाने उसंत न घेतल्याने डोंगर जमिनीत पाणी मुरूण्याची प्रक्रिया हळूवार सुरू आहे. त्यामुळे पावसाचा पडेल तो थेंब प्रवाहीत होतो, आणि पाणी सैरभैर होते. परिणामी शिवारात बघेल तिकडे पाणीच पाणी पसरलेले पहावयास मिळत आहे. त्यात धरणे तुडूंब झाल्याने त्यातून एक सारखा विसर्ग सुरू आहे.
नद्यांच्या पाणी पातळी वाढू लागली आहे. नदी काठावरील पिकांतून गेले दीड महिना पाणीच हललेले नाही. नदीकाठचे ऊस, भात ही पिके कुूजू लागली आहेतच पण डोंगर माथ्यावरील गवतही खराब झाले आहे. पशु-पक्षी गारठून गेली असून दूध उत्पादनांवरही परिणाम झाला आहे. एकूणच पावसाने अक्षरशा दैना उडवून दिल्याने सांग सांग भोलानाथ पाऊस थांबेल का? अशी म्हणण्याची वेळ सर्वांवर आली आहे.
डोंगर, कपाऱ्या उगळल्या!
जमिनीतील पाण्याची पातळी समतोल झाली की त्यातून पाणी पाझरणे सुरू होते. गेले वर्षी फार काळ डोंगर, कपाऱ्यांतून धो धो वाहणारे झरे पहावयास मिळाले नाहीत. पण जूलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेले झरे अद्याप एक सारखे ओसांडून वाहत आहेत.
११०० मालमत्तांचे अडीच कोटीचे नुकसान
धुवांदार पावसाने खासगी, सार्वजनिक मालमत्ता नुकसानीसह जिवीतहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. जिल्ह्यात १०९७ खासगी तर ११ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान होऊन २ कोटी ५३ लाख ३७ हजाराचे नुकसान झाले आहे.