सिद्धनेर्लीकरांच्या वृक्षसंवर्धनाचा आदर्श राज्यभर पोहचवू - सयाजी शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 11:03 PM2022-07-15T23:03:50+5:302022-07-15T23:04:38+5:30
Sayaji Shinde : सिद्धनेर्लीकरांचा हा आदर्श राज्यभरात पोहचवू असा मानस सुप्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला.
सिद्धनेर्ली : गावात मंदिरे किती मोठी आहेत. यापेक्षा त्या गावात झाडी किती बहरलेली आहेत हे महत्त्वाचे आहे. येथील पाणंद रस्ते अतिक्रमणातून मुक्त करत दोन्ही बाजूचा सदुपयोग करून दुतर्फा घनदाट झाडी निर्माण केली आहे. सिद्धनेर्लीकरांचा हा आदर्श राज्यभरात पोहचवू असा मानस सुप्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला. झाडांपेक्षा मोठा सेलिब्रिटी कोणीही नसल्याचे सांगत त्यांनी वनराईचे महत्त्व अधोरेखित केले.
सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील सह्याद्री देवराई प्रणित निसर्ग व पर्यावरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या पर्यावरण संवाद मेळाव्यात ते बोलत होते. प्रास्तविक मधुकर येवलूजे यानी केले. यावेळी सरपंच दत्तात्रय पाटील, सुभाष वायंगणकर, सचिन चांदणे यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी वाय व्ही पाटील, संगीता पोवार, विवेक पोतदार, सदाशिव निकम, संदीप मगदूम, पर्यावरण प्रेमी, ग्रामस्थ उपस्थित होते. वाय एन पोवार यांनी आभार मानले.
सिद्धनेर्लीकरांनी वृक्षारोपणाचा उपक्रम यापुढेही असाच चालू ठेवावा.तसेच, यापुढे गावात मूल जन्माला आले की त्याच्या नावाने एक झाड लावण्याचा उपक्रम ही हाती घ्यावा, असेही सयाजी शिंदे म्हणाले. यावेळी सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपण केलेल्या झाडांची पाहणी केली.