पाचवी ते सातवीतील पुस्तकांचा तुटवडा

By Admin | Published: July 26, 2016 11:58 PM2016-07-26T23:58:15+5:302016-07-27T00:38:34+5:30

शिक्षकांसह विद्यार्थ्यांची गोची : शाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी पुरवठा नाहीच

Scarcity of books from fifth to seventh | पाचवी ते सातवीतील पुस्तकांचा तुटवडा

पाचवी ते सातवीतील पुस्तकांचा तुटवडा

googlenewsNext

प्रकाश पाटील --कोपार्डे --मोफत व सक्तीचा शिक्षण कायदा २0१0 ने आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी पुस्तके देण्यात येतील, अशी घोषणा शिक्षकमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. मात्र, शाळा सुरू होऊन सव्वा महिना झाला, तरी पाचवी ते सातवीच्या वर्गांतील हिंदी विषयासह अन्य काही पुस्तकेच उपलब्ध झालेली नाहीत. यामुळे शिक्षकांपेक्षा विद्यार्थ्यांसमोर पुस्तकाविना अभ्यास करायचा कसा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
राष्ट्रभाषा म्हणून हिंदीला स्थान दिले गेले आहे. मराठी, इंग्रजी व हिंदी या तीन भाषांना अभ्यासक्रमात महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, नेमके राष्ट्रभाषा असलेल्या हिंदी विषयालाच दुय्यम स्थान खुद्द शासनाकडून दिले जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून नवीन चकचकीत पाठ्यपुस्तके देण्याचा उपक्रम आघाडी सरकारने सुरू केला. तोच उपक्रम भाजप-सेना युती शासनानेही सुरू ठेवला आहे. राज्यात सर्व शाळांमध्ये शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी आठवी पर्यंतच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जातील, अशी घोषणा खुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली होती. यासाठी आपल्या शाळेत असणाऱ्या संभाव्य पटसंख्येची माहिती वेळेत देण्याच्या सूचनाही शाळांना देण्यात आल्या होत्या.
या सूचनेप्रमाणे शाळांनी आपल्याकडे असणाऱ्या विद्यार्थ्यांची संभाव्य पटसंख्या वर्गवार एप्रिल महिन्यातच सादर केली आहे. तरीही शिक्षण विभागाला या विद्यार्थी संख्येचा मेळ घालता आलेला दिसत नाही. बहुतांश शाळांमध्ये पटसंख्येपेक्षा कमी पाठ्यपुस्तके आली आहेत, तर काही पुस्तके उपलब्धच झालेली नाहीत. एक महिना शाळा सुरू होऊन झाला तरी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना हिंदी विषयाचे पुस्तकच मिळालेले नाही. सहावीच्या सेमी इंग्रजी विभागाचे सायन्सचे पुस्तकही विद्यार्थ्यांना अद्याप मिळालेले नाही.
पाचवीच्या ‘परिसर अभ्यास’ या विषयाची पुस्तकेही मागणीच्या ५0 टक्केच उपलब्ध झाली आहेत, तर सहावीच्या वर्गासाठी हीच अवस्था झाली आहे. सर्व विषयांच्या पुस्तकांबाबत अशी अवस्था झाली आहे. सातवीच्या वर्गासाठी इंग्रजी, गणित, इतिहास, नागरिकशास्त्र या पुस्तकांचीही पूर्ण पटसंख्येप्रमाणे उपलब्धता नाही. दरवर्षी स्वाध्याय पुस्तिका मिळत होती, ती यावर्षी मिळालेलीच नाही. वास्तविक १५ जूनला शाळा सुरू झाली असताना, जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही पुस्तके उपलब्ध व्हायला हवी होती; पण तसे न झाल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालकांची गोची झाली आहे.

सहावीचा अभ्यासक्रम बदलला
यावर्षी सहावीचा अभ्यासक्रम बदलला असून, आता मागील वर्षाची पुस्तके वापरणेही कठीण झाले आहे.
काही शाळांनी शाळा सुरू होताच पाचवी व सातवीच्या वर्गांतील विद्यार्थ्यांकडून ही पुस्तके गोळा करून काम चालविले असले, तरी सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत.


दरवर्षी पुस्तके वेळेवर देण्याचा उपक्रम राबविला जायचा. यामुळे अभ्यासक्रम वेळेत सुरू व्हायचे. मात्र, यावर्षी काही पुस्तके मुलांना न मिळाल्याने मुले शिक्षकांना भंडावून सोडत आहेत. बाजारातून खरेदी करावीत आणि शासनाने दिल्यास पालकांना त्याचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. तसेच यावर शिक्षकही पुस्तके कधी मिळणार, हे सांगायला तयार नाहीत. त्यामुळे या विभागाचा भोंगळ कारभारच पाहायला मिळत आहे.
- कृष्णात कुंभार, पालक, खुपिरे, ता. करवीर

Web Title: Scarcity of books from fifth to seventh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.