मेहुण्या-पाहुण्यांत पुन्हा संघर्षाची ठिणगी, राधानगरी विधानसभेचे रणांगण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:42 PM2019-07-19T12:42:25+5:302019-07-19T12:45:11+5:30
मुदाळ (ता. भुदरगड) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास माजी आमदार के. पी. पाटील यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्याच कार्यकर्त्यांना न बोलावल्याने गुरुवारी नव्या वादाला तोंड फुटले. या मेळाव्याचे निमंत्रण दस्तुरखद्द ए. वाय. पाटील यांनाही दिले नाही; त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना मेळाव्यास जायचे नाही, असा दम दिला. त्यातून मेहुण्या-पाहुण्यांत राजकीय संघर्षाची ठिणगी पडली.
दत्ता लोकरे
सरवडे : मुदाळ (ता. भुदरगड) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास माजी आमदार के. पी. पाटील यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्याच कार्यकर्त्यांना न बोलावल्याने गुरुवारी नव्या वादाला तोंड फुटले. या मेळाव्याचे निमंत्रण दस्तुरखद्द ए. वाय. पाटील यांनाही दिले नाही; त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना मेळाव्यास जायचे नाही, असा दम दिला. त्यातून मेहुण्या-पाहुण्यांत राजकीय संघर्षाची ठिणगी पडली.
‘आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्या, ती आम्हाला मान्य असेल,’ असा शब्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाच या दोघांनी मागच्या पंधरवड्यात मुंबईत झालेल्या बैठकीत दिला. तो शब्दही हवेतच विरला असून, राधानगरी मतदारसंघाची पक्षाची उमेदवारी कोणाला द्यायची याची डोकेदुखी वाढली आहे. उमेदवारी कुणालाही मिळो; दुसरा मात्र बंडखोरी करणार हेदेखील या घडामोडीमुळे स्पष्ट झाले.
राधानगरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी जिल्हाध्यक्ष असणाऱ्या मेहुणे-पाहुण्यांचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक बाबतीत एकमेकांवर कुरघोडीची स्पर्धा लागली असून, राजकीय महाभारताचा पुढील अंक सुरू झाला आहे. परिणामी या दोघांतील समेट औटघटकेचाच ठरला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीची तयारी म्हणून के. पी. यांनी जिल्हाध्यक्षांच्या सरवडे या होमपीचवरील कार्यकर्त्यांची बैठक मुदाळ येथील स्वत:च्या पॉलिटेक्निक इमारतीत सायंकाळी सहा वाजता बोलावली होती. ती रात्री नऊ वाजेपर्यंत झाली. बैठकीनंतर स्नेहभोजनाचा बेत होता. बैठकीस के. पी. पाटील, रणजित पाटील, विकास पाटील यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, उमेश भोईटे हे प्रमुख उपस्थित होते.
‘राधानगरी तालुक्यातून तुम्ही मावळ्यांनी मला साथ द्यावी. तुमच्या ताकदीवर ही लढाई मी या वेळेला जिंकणारच,’ असा विश्वास के. पी. पाटील यांनी व्यक्त केला. राधानगरी तालुक्यातून ए. वाय. पाटील यांच्या कार्यकर्त्यांना वगळून लोक बाहेर पडतात का आणि आपल्याला कितपत पाठबळ मिळते, याची चाचपणी करण्यासाठीच या मेळाव्याचे आयोजन केले होते. हा राधानगरी तालुक्यातील पहिलाच मेळावा होता व यापुढे पाच जिल्हा परिषद मतदारसंघांत असे मेळावे घेण्याचे जाहीर करण्यात आले.
मध्यंतरी या दोघांनी आम्हाला कुणा एकाला उमेदवारी दिली, तर ताकदीने लढू, असे कबूल केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या समेटाच्या बातम्या झळकल्या. मात्र, लगेचच एकमेकांविरोधात कार्यकर्ते भेटी, मृत व्यक्तीच्या घरी बोलवायला जाणे, काही कार्यकर्त्यांना जेवणावळी यातून दोघांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार मोर्चबांधणी सुरू केली आहे.
ए. वाय. पाटील यांनी आपला संपर्क वाढवत सोळांकूर येथे तरुणांचा बूथ मेळावा घेतला; तर के. पी. पाटील यांनी कूर, मुदाळनंतर बुधवारी वाशी येथे मेळावा घेतला. या घडामोडींमुळे कुंपणावरील कार्यकर्त्यांची कोंडी झाली असून, मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील उभी फूट अटळ बनलेली आहे.
पोस्टरवरून फोटो गायब
गारगोटीत राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालय उद्घाटनास जिल्हाध्यक्षांना डावलले, त्याचबरोबर पोस्टरवर पाटील यांचा फोटोही नव्हता. ए. वाय. पाटील यांनी बूथ मेळाव्यात तसेच कॅलेंडरवर राज्यपातळीवर नेत्यांचे फोटो आहेत; पण के. पी. पाटील यांना डावलले, असा हिशेब चुकता करण्याची एकही संधी दोघे सोडत
नाहीत.
मामा-भाचे आणि मेहुणे-पाहुणे
बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे हे ‘बिद्री’चे संचालक राजेंद्र पाटील यांचे मामा आहेत. त्यांच्यात अनेकदा राजकीय हेवेदावे होतात. काही वेळा वेगळे लढले, त्यात अपयश आले. मात्र, पुन्हा ते सर्व विसरून एकत्र आले. तसेच हे मेहुणे-पाहुणेसुद्धा एकत्र येतील म्हणून कार्यकर्ते गप्प होते; परंतु सद्य:स्थितीत या दोघांच्याही गाड्या लांब पुढे गेल्या आहेत.
गारगोटीमध्ये पक्षाचे अधिकृत कार्यालय झाले; परंतु तिथे जिल्हाध्यक्ष म्हणून माझा फोटो नाही. आजपर्यंत के. पी. पाटील यांनी घेतलेल्या मेळाव्यांना मी जिल्हाध्यक्ष असूनही निमंत्रण नव्हते. त्यामुळे मी त्यांना का म्हणून निमंत्रण द्यायचे?
- ए. वाय. पाटील
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
सोळांकूरसह विविध ठिकाणी ए. वाय. पाटील यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून घेतलेल्या मेळाव्यास मी पक्षाचा माजी आमदार असतानाही बोलावले नाही. त्यामुळे मी त्यांना बोलाविण्याची अपेक्षा करू नये.
- के. पी. पाटील
माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस