सजीव देखाव्यांची कसबा बावड्यात धूम
By admin | Published: September 23, 2015 11:51 PM2015-09-23T23:51:37+5:302015-09-24T00:03:03+5:30
कलात्मक, आकर्षक गणेशमूर्ती : ऐतिहासिक, धार्मिक, पर्यावरण, सामाजिक विषयांचे देखाव्यात प्रतिबिंब
कसबा बावडा : कसबा बावडा आणि परिसरातील मंडळांनी यंदाही सजीव देखाव्यांवर भर दिला आहे. ऐतिहासिक, धार्मिक, पर्यावरणावर आधारित, शेतकऱ्यांच्या समस्या, दुष्काळ, हुंडाबळी, तसेच विनोदी आणि तांत्रिक देखाव्यांसह विविध वस्तंूपासून बनविण्यात आलेल्या कलात्मक आकर्षक गणेशमूर्ती हे यंदा बावड्यातील गणेशोत्सवाचे आकर्षण असणार आहे. काही अपवाद मंडळाचे बुधवार (दि. २३) पासून देखावे खुले झाले. तर बहुतेक मंडळांचे गुरुवार (दि. २४) पासून देखावे नागरिकांना पाहण्यासाठी खुले होणार आहेत.
पाटील गल्ली येथील छत्रपती शिवाजीराजे तरुण मंडळ यावर्षी ‘राजा शिवाजी’ हा सजीव देखावा सादर करीत आहे. यासाठी मंडळाने लाल महालची भव्य प्रतिकृती उभारली आहे. देखाव्यात तत्कालीन लग्नाचा प्रसंग, लाल महालातील लढाई व आकर्षक लाईट इफेक्ट हे प्रमुख आकर्षण असल्याचे मंडळाचे अध्यक्ष राजकुमार पाटील यांनी सांगितले.
चौगले गल्ली येथील भारतवीर मित्र मंडळाने ‘देव तेथेची जाणावा’ हा सजीव देखावा केला आहे. दुष्काळ, पाऊस आणि पर्यावरणपूरक संदेश या देखाव्यातून दिला आहे. तालीम चौक येथील स्वस्तिक मित्र मंडळाने ‘प्रकाशवाट’ ‘करुया सुरुवात एका नव्या युगाची’ हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावर देखावा केला आहे. ठोंबरे गल्लीतील जय शिवराय तरुण मंडळाने ‘कलियुगी अफजलखान’ हा मोबाईलचे व्यसन यावर आधारित देखावा केला आहे. श्री मंगेश्वर तरुण मंडळाने ‘बाई हसली, पोरं फसली’ हा विनोदी देखावा केला आहे. कवडे गल्लीतील गणेशपूजा मित्र मंडळाने सीमा प्रश्नावर आधारित देखावा केला आहे. धनगर गल्ली येथील हिंदू एकता आंदोलनने दुष्काळावरील सामाजिक प्रश्न मांडणारा देखावा केला आहे.
चव्हाण गल्लीतील सम्राट मित्र मंडळाने पशुपतीनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती उभारली आहे. डगमग बॉईजने विनोदी देखावा केला आहे. अंकुश ग्रुपने विनोदी देखावा केला आहे. जयभवानी तालीम मंडळाने ‘साई दर्शन’ हा तांत्रिक देखावा केला आहे. जय भवानी फ्रेंड सर्कलने विनोदी देखावा केला आहे. पंचमुखी तरुण मंडळाने ‘तुझविन सख्या रे’ हा विनोदी देखावा केला आहे. विश्वशांती मित्र मंडळाने शहीद जवान दिगंबर उलपे यांच्या जीवनावरील सजीव देखावा केला आहे.
वाडकर गल्ली येथील शिवाजी तरुण मंडळाने ‘बळ’ हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयावर देखावा केला आहे. विजय विहार तरुण मंडळप्रणित शिवा ग्रुपने ‘तुझा खेळ तूच जाण’ हा भक्तिमय देखावा केला आहे. झेंडा चौक मंडळाने कुष्ठरोग्यांच्या जीवनावर सजीव देखावा केला आहे. कागलवाडी मित्र मंडळाने ‘बाल हनुमान’ देखावा केला आहे.
अयोध्या कला, क्रीडा मंडळाने बाल गणेशाचा पाण्यात विहार हा तांत्रिक देखावा केला आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे तरुण मंडळाने काड्यापेटीच्या काड्यांपासून आकर्षक गणेशमूर्ती केली आहे. शाहू तरुण मंडळाने वरीच्या तांदळापासून गणेशमूर्ती केली आहे. याशिवाय साईनाथ मित्र मंडळ, शिवनेरी मित्र मंडळ, गणेश मित्र मंडळ, भगतसिंह तरुण मंडळ यांच्या आकर्षक गणेशमूर्ती आहेत. (प्रतिनिधी)