अकरावीच्या केंद्रीय प्रवेशाचे वेळापत्रक आज जाहीर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:29 AM2021-08-18T04:29:16+5:302021-08-18T04:29:16+5:30
कोल्हापूर : शहरातील विविध ३५ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावी प्रवेशासाठी यावर्षी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेचे ...
कोल्हापूर : शहरातील विविध ३५ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावी प्रवेशासाठी यावर्षी ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक आज, बुधवारी दुपारी ४ वाजता जाहीर होणार आहे.
कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेतील अकरावी प्रवेशासाठी कोल्हापूर आणि गडहिंग्लज शहरात केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. शासन आदेशानुसार यंदाही केंद्रीय प्रक्रिया असणार आहे. कोल्हापूर शहरातील ऑनलाइन प्रक्रियेसाठी लागणाऱ्या संगणक प्रणालीबाबतची निविदा केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने प्रसिद्ध केली आहे. या निविदेची मुदत मंगळवारी (दि.१७) संपली. त्यानंतर आज, बुधवारी दुपारी १२ वाजता समितीतील सर्व प्राचार्यांची बैठक महाराष्ट्र हायस्कूल येथे होणार आहे. त्यामध्ये प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित करून ते जाहीर करण्यात येईल, अशी माहिती या समितीचे सचिव आणि सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, शासकीय आणि खासगी तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक)मधील प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत दि.२० ऑगस्टपर्यंत आहे. जिल्ह्यातील तंत्रनिकेतनसाठी एकूण ५५०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, त्यापैकी ४५०० जणांनी बुधवारपर्यंत अर्जांची निश्चिती केली आहे. थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची मुदत दि.२३ ऑगस्टपर्यंत असल्याची माहिती नोडल ऑफिसर प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांनी दिली.