कोल्हापूर-गगनबावडा एस.टी.चे वेळापत्रक विस्कळीत
By Admin | Published: February 4, 2015 10:05 PM2015-02-04T22:05:29+5:302015-02-04T23:57:45+5:30
वडापला सुगीचे दिवस : रंकाळा डेपोच्या चुकीच्या वेळापत्रकाचा प्रवाशांना त्रास
प्रकाश पाटील -कोपार्डे -- ‘वाट बघत थांबू; पण एस.टी.नेच जाऊ’, हे ब्रीदवाक्य आजच्या धावत्या जगात कालबाह्य ठरत असून, आपल्या ब्रीदवाक्यात बदल करून एस.टी.ने व्यावसायिकता जपली नाही तर चाके तोट्यात रुतल्याशिवाय राहणार नाहीत. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर रंकाळा आणि गगनबावडा या दोन्ही आगारांकडून धावणाऱ्या एस.टी. बसेसचे वेळापत्रक विस्कळीत असण्याबरोबरच कमी फेऱ्या असल्याने प्रवासी, विद्यार्थी, नोकरदारांना वडापचा आधार घ्यावा लागत आहे.
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरून करवीर, पन्हाळा, राधानगरी या तालुक्यांतील अनेक गावांना रंकाळा, संभाजीनगर व गगनबावडा डेपोंकडून एस.टी.ची प्रवासी सेवा सुरू आहे. या मार्गावर कुंभी-कासारी व डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून मोठा आर्थिक व शैक्षणिक विकास झाला आहे. त्याशिवाय कोपार्डे येथील जनावरांचा बाजार, कळे (ता. पन्हाळा) सारखी ग्रामीण भागात असणारी मोठी बाजारपेठ, कुंभी-कासारी कारखाना तर विकासाचा केंद्रबिंदू असून याठिकाणी एक महाविद्यालय, तीन माध्यमिक शाळा, एक औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, दोन राष्ट्रीयीकृत बॅँका, दोन सहकारी बॅँका, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे झाल्याने जिल्ह्याच्या पश्चिम भागातील जवळजवळ २०० ते २५० गावांतील लोकांना येथे येण्यासाठी एस.टी.चाच मोठा आधार आहे. त्याचबरोबर शहरात मोठी शासकीय कार्यालये असल्याने व एम.आय.डी.सी.ला कामाला जाणारा मोठा वर्ग एस.टी.च्या प्रवासाला प्रथम पसंती देतो. मात्र, वरील तिन्ही डेपोंकडून एकतर फेऱ्या कमी आहेतच; शिवाय ज्या एस.टी. बसेस सोडल्या जातात, त्या अनियमित असल्याने जनतेची गैरसोय होते. कामावर अथवा शाळेत वेळेत पोहोचण्यासाठी मग वडापचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
या मार्गावर तीनचाकी रिक्षांचे वडाप मोठ्या प्रमाणात असून, पाच प्रवाशांचा वडापचा परवाना असताना अक्षरश: १२ व त्याहून अधिक लोकांना बसवले जाते. त्यामुळे एस.टी.च्या उत्पन्नावर डल्ला पडत असून, अतिशय चांगल्या उत्पन्नाचे पॉकेट एस.टी. प्रशासनाकडून दुर्लक्षित होत आहे.
कोल्हापूर-कळे जनता गाडी सुरू व्हावी
गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर-कळे व कोल्हापूर-बाजारभोगाव या मार्गावरील जनता गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. अर्ध्या तासाला या गाड्या सोडल्या जात असल्यामुळे प्रवाशांची मोठी सोय व्हायची. त्यामुळे बंद केलेल्या जनता गाडी सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.