राज्य नाट्य स्पर्धेची वेळ सायंकाळीच करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 02:23 PM2019-11-04T14:23:25+5:302019-11-04T14:24:35+5:30
राज्य हौशी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, सर्वच नाट्यप्रयोगांची वेळ सायंकाळी सातनंतर करावी, अशी मागणी परिवर्तन कला फौंडेशनतर्फे राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे करण्यात आली आहे.
कोल्हापूर : राज्य हौशी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, सर्वच नाट्यप्रयोगांची वेळ सायंकाळी सातनंतर करावी, अशी मागणी परिवर्तन कला फौंडेशनतर्फे राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे करण्यात आली आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे होणाऱ्या या स्पर्धेत एकूण २९ नाट्य कलाकृती सादर होणार आहेत. यातील काही नाटकांची वेळ दुपारी बारा वाजता करण्यात आली आहे. ही वेळ व्यवहार्य नाही. त्यामुळे रसिक या दरम्यानच्या नाटकांकडे पाठ फिरवतील. विशेष म्हणजे रविवारी दुपारी १२ वाजता तीन नाटके सादर होणार आहेत. हे अन्यायकारक आहे. राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना प्रेक्षकांच्या तिकिटातून मिळणाऱ्या रकमेच्या अर्धी रक्कम मिळते. त्यामुळे हौशी नाट्य संस्थांना ही मदत होते. दुपारी जर प्रयोग बारा वाजता होणार असेल, तर ही मदत मिळणार नाही.
कोल्हापूर केंद्रात कष्टकरी फेरीवाले, सर्वसामान्य नागरिक रात्रीच नाट्यप्रयोग पाहण्यास पसंती देतात. त्यांचाच या स्पर्धेच्या काळात हौशी नाट्यकर्मींना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. या रसिकांना रविवारी सुट्टी मिळत नाही.
आमची संस्था स्पर्धेत फक्त बक्षिसासाठी सहभागी होत नाही, तर कलाकार घडावेत व प्रेक्षकांना नाटक बघता यावे या उद्देशाने सहभागी होते. ही संधी नाट्य स्पर्धेच्या रूपाने आम्हाला मिळते. त्यामुळे सर्वच नाट्यप्रयोग सायंकाळी सातनंतर घ्यावेत, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती फौंडेशनचे किरणसिंह चव्हाण यांनी दिली.