‘स्कॉलर’ बनला अट्टल चोरटा

By admin | Published: April 23, 2016 01:28 AM2016-04-23T01:28:46+5:302016-04-23T01:42:13+5:30

चैनीचा हव्यास : देऊळवाडीच्या महाविद्यालयीन युवकाचे कृत्य; साडेअकरा लाखांचा माल जप्त

'Scholar' became an intransigent thief | ‘स्कॉलर’ बनला अट्टल चोरटा

‘स्कॉलर’ बनला अट्टल चोरटा

Next

कोल्हापूर : चैनी, सुखासीन जगण्याची सवय व महागडे मोबाईल, दुचाकी गाड्या वापरण्याच्या हव्यासापोटी सामान्य कुटुंबातील दहावीमध्ये ९५ टक्के गुण मिळविणारा गुणवंत विद्यार्थी घरफोडी करणारा अट्टल चोरटा बनला. अवधूत ईश्वरा पाटील (वय १९, रा. देऊळवाडी,ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून तब्बल दहा घरफोड्यांतील सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप व दोन दुचाकी असा सुमारे ११ लाख ३६ हजार ३२५ रुपयांचा माल जप्त केला. याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिस अधीक्षक देशपांडे म्हणाले, ‘एक विद्यार्थी दर आठवड्याला वेगवेगळे महागडे मोबाईल वापरत असून त्याच्याकडे दोन महागड्या दुचाकी आहेत. तो आठवड्याला सुमारे चार ते पाच हजार रुपये खर्च करतो,’ अशी माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवून त्याची सर्व माहिती मिळविली.
त्यानुसार संशयित अवधूत ईश्वरा पाटील याला बुधवारी (दि. १९) पकडले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गोवा येथे चोरलेल्या पाकिटातील कृष्णात सीताराम बाचणकर यांचा वाहन परवाना देऊन दुचाकी भाड्याने घेऊन ती चोरून आणल्याचे सांगितले. त्यानंतर सावंतवाडी येथून एक मोपेड त्याने चोरली. चोरलेल्या पाकिटातील पैसे, एटीएम कार्डचा वापर करून अवधूतने खरेदी-विक्री करणाऱ्या वेबसाईटवर बनावट अकौंट
व ई-मेल आयडी तयार केला. त्या अकौंटवरूनच तो चोरलेले मोबाईल विकू लागला. त्यानंतर तो सीमकार्ड नष्ट करत होता. चोरीच्या पैशांतून वेबसाईटवरून खरेदी केलेले व चोरलेले मोबाईल, लॅपटॉप जादा किमतीने विक्री करत असे. पाकीट, लॅपटॉप चोरता-चोरता त्यानंतर बंद घर, फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून घरफोडी करून लागला. त्याने चोरलेल्या १२ लाख ७५ हजार २५ रुपये किमतीच्या मुद्देमालापैकी सुमारे ११ लाख ३६ हजार ३२५ रुपयांचा माल जप्त केला आहे. त्याला न्यायालयाने सोमवारी (दि. २५)पर्यंत पोलिस कोठडी दिली.
ही कारवाई पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक युवराज आठरे, हेड कॉन्स्टेबल भारत कांबळे, अजिज शेख, राहुल देसाई, विजय देसाई, विनायक फराकटे, अजित वाडेकर, सागर कोळी, अभिजित व्हरांबळे,प्रशांत पाथरे,सुभाष चौगुले,संदीप कापसे यांनी केली.यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक चैतन्या एस.डॉ.दिनेश बारी,शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे उपस्थित होते.
शिक्षा व्हावी : पालकांची भावना
अवधूत हा महाविद्यालयात वेगवेगळे महागडे मोबाईल, ब्रँडेड कपडे वापरत असल्यामुळे महाविद्यालयामधील मित्र-मैत्रिणी त्याचे कौतुक करत असत. चोरीच्या पैशांतून तो मित्रांना पार्टी देत होता. त्याचबरोबर देऊळवाडी गावाकडे तो दुचाकी घेऊन जात असे. घरच्यांनी विचारले तर ही मित्राची दुचाकी आहे, असे तो सांगत असे. चोरीच्या प्रकाराबद्दल त्याला शिक्षा झाली पाहिजे, असे पाटील कुटुंबीयांचे मत असल्याचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी पत्रकारांना सांगितले.
आता रडून काय उपयोग...
दोन दिवसांपूर्वी अटक केलेला संशयित अवधूतला केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप झाला. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेवेळी तो रडू लागला. आपली चूक झाल्याची भावना त्याच्या चेहऱ्यावर होती.

---------------

तरुणाईची गुन्हेगारी प्रवृत्तीची वाटचाल ही धोकादायक आहे. ती बदलणे गरजेचे आहे.त्यासाठी आता समाजातील स्वयंसेवी संस्थांनी असे चित्र बदलण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.
- प्रदीप देशपांडे, जिल्हा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर.

Web Title: 'Scholar' became an intransigent thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.