शिष्यवृत्तीची परीक्षा दिली ३६,३४२ जणांनी, काही प्रश्न चुकीचे : पालकांमधून नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 03:03 PM2020-02-17T15:03:49+5:302020-02-17T15:06:24+5:30
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण ३६ हजार ३४२ विद्यार्थी बसले होते. पेपर क्रमांक १ व २ मध्ये काही प्रश्न व उत्तराचे पर्याय चुकीची असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत आपल्याकडे तक्रार आली नाही. काही त्रुटी असतील त्या संदर्भात कमिटी स्थापन केली असून ती निर्णय घेईल,असे राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने सांगण्यात आले.
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण ३६ हजार ३४२ विद्यार्थी बसले होते. पेपर क्रमांक १ व २ मध्ये काही प्रश्न व उत्तराचे पर्याय चुकीची असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत आपल्याकडे तक्रार आली नाही. काही त्रुटी असतील त्या संदर्भात कमिटी स्थापन केली असून ती निर्णय घेईल,असे राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने सांगण्यात आले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी), पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी जिल्ह्यातील २३४ केंद्रांवर पार पडल्या. महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पाचवीसाठी १४२ केंद्र तर आठवीसाठी ९२ केंद्रांवर परीक्षा झाली. एकूण ३६ हजार ३४२ जणांनी ही परीक्षा दिली.
शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा सुरू केली आहे. अनेक पालक विद्यार्थ्यांची या परीक्षेसाठी वर्षभर तयारी करून घेत असतात. हीच परीक्षा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य घडवत असते. तसेच परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीच्या रूपातून आर्थिक मदत मिळत असते. त्यामुळे मिळालेल्या शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती घडत असते. मात्र, शिष्यवृत्ती परीक्षेत काही प्रश्न चुकीचे असल्याचे निदर्शनास आल्याने पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली.
प्रश्नपत्रिका काढण्यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञांकडून अशा अक्षम्य चुका होत असतील, तर या परीक्षा परिषदेवर विश्वास राहणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहे.
राज्यातील परीक्षा सुरळीत पार पडली, कुठेही प्रश्नपत्रिका कमी पडल्या अथवा उशिरा पोहोच झाल्या नाहीत. प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांबाबत पालकांचा काही आक्षेप असला तरी परिषदेमार्फत ‘आन्सर की’ प्रसिद्ध करणार आहे. काही त्रुटी असतील त्यासंदर्भात कमिटी स्थापन केली असून, याबाबत कमिटी निर्णय घेईल. कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.
स्मिता गौंड,
सहाय्यक आयुक्त, परिषद पुणे
४२४ जण गैरहजर
जिल्ह्यात पाचवीसाठी २३,४५० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २३,२१५ जण प्रत्यक्ष परीक्षेला बसले. २४० परीक्षार्थी अनुपस्थित राहिले. आठवीसाठी १३,३११ जणांनी परीक्षा अर्ज भरला होता. त्यापैकी १३,१२७ जण प्रत्यक्ष परीक्षेला बसले. १८४ परीक्षार्थी अनुपस्थित राहिले. मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी व कन्नड या पाच माध्यमांतून ही परीक्षा घेण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर कार्बनलेस कॉपीसह उत्तरपत्रिका देण्यात आली. पेपर १- सकाळी ११ ते १२.३० व पेपर २ - दुपारी १.३० ते ३ यावेळेत पार पडले.