विद्यापीठातील ‘संख्याशास्त्र’च्या चार शिक्षकांच्या नावाने शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:28 AM2021-09-04T04:28:57+5:302021-09-04T04:28:57+5:30
विद्यापीठातील संख्याशास्त्र अधिविभागाची पायाभरणी करणाऱ्या प्रमुख शिक्षक- संख्याशास्त्रज्ञांमध्ये प्रा. एम. एस. प्रसाद, आर. एन. रट्टीहळ्ळी, एस. आर. कुलकर्णी, बी. ...
विद्यापीठातील संख्याशास्त्र अधिविभागाची पायाभरणी करणाऱ्या प्रमुख शिक्षक- संख्याशास्त्रज्ञांमध्ये प्रा. एम. एस. प्रसाद, आर. एन. रट्टीहळ्ळी, एस. आर. कुलकर्णी, बी. व्ही. धांद्रा यांचा समावेश आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सन १९८४ ते १९९५ या कालावधीत एम. एस्सी., पीएच. डी. संशोधन पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांनी या प्राध्यापकांच्या योगदानाच्या कायमस्वरूपी सन्मानस्मृती जपण्याच्या भावनेतून त्यांच्या नावे चार विविध शिष्यवृत्ती देण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी सुमारे पाच लाख रुपयांचा कृतज्ञता निधी उभारला. हा निधी विद्यापीठाकडे वर्ग केला आहे. त्या निधीच्या व्याजामधून अधिविभागात एमएस्सी. प्रथम व द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकी दोन याप्रमाणे चार होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती अधिविभागप्रमुख डॉ. एच. व्ही. कुलकर्णी आणि माजी विद्यार्थी समिती समन्वयक डॉ. सोमनाथ पवार यांनी दिली.
प्रतिक्रिया
संख्याशास्त्र अधिविभागाच्या सन १९८४ ते १९९५ या कालखंडात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या माजी विद्यार्थ्यांनी उचललेले शिष्यवृत्तीचे हे पाऊल स्वागतार्ह, अनुकरणीय आहे. या माध्यमातून या अधिविभागाच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या प्रती आदरभाव जपला जाईल. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी चांगली आर्थिक मदत होईल.
-डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू