वीटभट्टीवरील कामगारांच्या मुलांना स्कूल बस
By admin | Published: March 10, 2017 11:52 PM2017-03-10T23:52:30+5:302017-03-10T23:52:30+5:30
‘लोकमत’च्या वृत्तानंतर निधी : शिक्षण विभागाकडून सव्वा लाखाचा निधी; उदगाव-चिंचवाडमधील मुले
संतोष बामणे --जयसिंगपूर
महाराष्ट्र शासनाच्या ‘सारे शिकूया पुढे जाऊया’ या धोरणाप्रमाणे एकही मूल निरक्षर राहू नये, यासाठी गेल्या
११ वर्षांपासून शिरोळ तालुक्यातील उदगाव, चिंचवाड येथे विटभट्टीवर काम करणाऱ्या कर्नाटकातील कामगाराच्या मुलांना शिक्षणाची सोय करून दिली आहे. मात्र, विटभट्टीच्या ठिकाणी शिक्षण न घेता शाळेतच शिक्षण मिळावे व विद्यार्थ्यांना स्कूलबसमधून ने-आण करण्यासाठी जिल्हा शिक्षण विभागाकडून एक लाख १९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
तालुक्यात मोलमजुरीसाठी दुष्काळी भाग व कर्नाटकातून मजूर येतात व त्यांची मुले शिक्षणापासून दूर राहू नयेत, यासाठी उदगाव येथील देसाई विद्यामंदिर, कन्या विद्यामंदिर, उदगाव टेक्निकल हायस्कूल व चिंचवाड कुमार विद्यामंदिर व कन्या विद्यामंदिरच्या शिक्षकांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना विटभट्टी परिसरातच कन्नड भाषेतील शिक्षण उपलब्ध करून दिले आहे.
जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी विटभट्टीच्या शाळेत भेट दिली होती. यावेळी या मुलांना शाळेतच शिक्षण मिळावे, यासाठी स्कूल बसची सोय उपलब्ध करून द्यावी, असे सांगितले होते. यासाठी शिक्षण विभागाकडून एक लाख १९ हजारांचा निधी दिला आहे.
या कामगारांच्या मुलांची संख्या चिंचवाड येथे ३५, तर उदगाव येथे ४२ विद्यार्थी आहेत. गेल्या ११ वर्षांत ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या कानडी बाह्य शाळेतून शिक्षण घेतले आहे. विद्यार्थ्यांना जेवण, पुस्तके, वह्या, पेन, कपडे याबरोबरच आरोग्य सुविधाही दिल्या आहेत. सुरगोंडा पाटील, सतीश पाटील, मुख्याध्यापक विजय कोळी, शोभा कोळी, मुख्याध्यापक रावसाहेब इंगळे, विस्तार अधिकारी वांद्रे, विस्तार अधिकारी अनिल ओमासे यांनी पुढाकार घेतला आहे.
‘लोकमत’चे कौतुक
उदगाव येथील सर्व शाळांनी एकत्रित येऊन कानडी शिक्षणापासून वंचित मुलांना कन्नड शिक्षणाची सोय करून दिली आहे. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी शाळेत भेट दिली होती. यावेळी या मुलांना शाळेत शिक्षण मिळण्यासाठी स्कूल बससाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले होते. सध्या एक लाख १९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने सर्वत्र ‘लोकमत’चे कौतुक होत आहे.
या शाळेत सोय : उदगाव-चिंचवाड येथील असलेल्या विटभट्टीवरील मुलांना उदगाव येथील देसाई विद्यामंदिर-७ विद्यार्थी, कन्या विद्यामंदिर-४ विद्यार्थी, उदगाव टेक्निकल हायस्कूल - ७ विद्यार्थी, चिंचवाड कुमार व कन्या विद्यामंदिर - ७ विद्यार्थी व जयसिंगपूर येथील ज्ञानसागर कन्या विद्यालयात १०४ विद्यार्थ्यांची स्कूलबसमधून जाण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे विटभट्टीवरील मुले आता स्कूल बसमधून शाळेत जाणार आहेत.