शाळकरी मुलाचा वडरगेत बुडून मृत्यू
By admin | Published: October 2, 2016 12:55 AM2016-10-02T00:55:09+5:302016-10-02T00:55:09+5:30
पाण्याच अंदाज न आल्याने दुर्घटना
गडहिंग्लज : वडरगे (ता. गडहिंग्लज) येथे मित्रांसोबत पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा तलावात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. पारस प्रमोद रावळ (वय १४) असे मुलाचे नाव आहे. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, वडरगे येथील जीवन शिक्षण विद्यामंदिरात सातवीत शिकणारा पारस शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर मित्रांसमवेत गावाशेजारील तलावात पोहायला गेला. त्याला अजून नीट पोहता येत नव्हते. पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. तेव्हा त्याच्यासोबतच्या मित्रांसह शेजारी कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी आरडाओरडा केला. पण तेवढ्यात खूप उशीर झाला होता. पाण्यात बुडाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. संजय देवार्डे यांच्या वर्दीनुसार गडहिंग्लज पोलिसांत नोंद झाली असून, हवालदार दत्ता शिंदे याबाबत अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
आधी नवरा गमावला आता मुलगा
मृत पारसचे मूळ गाव निंगुडगे (ता. आजरा) आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने पारसची आई त्याच्या लहान भावासह वडरगे (ता. गडहिंग्लज) येथे त्याच्या आजोळी राहण्यास आली. शनिवारी पारसच्या दुर्दैवी मृत्यूने नवरा गमावल्याचे दु:ख पचविण्यापूर्वीच मुलगा गमवावा लागल्याने त्याच्या आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.