Kolhapur: इचलकरंजीत शाळकरी मुलांच्या वादाचे पर्यवसान पालकांच्या झटापटीत; एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 11:51 AM2023-08-10T11:51:18+5:302023-08-10T12:05:08+5:30
दोन महिलांसह तिघे ताब्यात
इचलकरंजी : येथील कोले मळा परिसरातील शाळेत शाळकरी मुलांच्या वादाचे पर्यवसान पालकांच्या वादात झाले. त्यातून झालेल्या झटापटीत एका पालकाचा मृत्यू झाला. सद्दाम सत्तार शेख (वय २७, रा. स्वामी मळा) असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर मृताच्या नातेवाइकांनी संशयिताच्या दारावर लाथा घालत साहित्य विस्कटल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी शब्बीर अब्दुल गवंडी (रा. हनुमाननगर) याच्यासह दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. ही घटना कोले मळ्यातील पंडित जवाहरलाल नेहरू शाळेत बुधवारी सायंकाळी घडली. याबाबत शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सद्दाम शेख हा टेम्पोचालक होता. त्याचा मुलगा आणि त्याच परिसरात राहणाऱ्या शब्बीर गवंडी याचा भाचा हे दोघेही महापालिकेच्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यामंदिर या शाळेत शिकण्यास आहेत. शब्बीर याची बहीण सलमा आलासे यांच्या मुलाने सद्दाम यांच्या मुलास मारहाण केली होती. त्यामुळे सद्दाम याने या कारणावरून आलासे यांच्या मुलास कानफटीत मारले होते. या घटनेची माहिती कळताच सलमा यांनी भाऊ शब्बीर याला बोलावून घेतले. शाळा सुटण्याच्या सुमारास शब्बीर आणि त्याचे नातेवाइक तसेच सद्दाम शेख हे शाळेत आले.
मुलाला मारहाणीचा जाब विचारत असताना सद्दाम आणि शब्बीर यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यातूनच दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटीत सद्दाम हा अचानकपणे जमिनीवर कोसळला. ही माहिती समजताच सद्दाम यांच्या नातेवाइकांसह भागातील नागरिक घटनास्थळी जमले. त्यांनी सद्दाम याला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
घटनेची माहिती समजताच शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, निरीक्षक राजू ताशिलदार यांनी घटनास्थळ आणि रुग्णालय येथे धाव घेत घटनेची माहिती घेतली. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.