शालेय शुल्क तपासणी पथक नेमा, अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 02:43 PM2021-07-15T14:43:29+5:302021-07-15T14:46:23+5:30
Education Kolhapur : शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाची अंमलबजावणी करत येत्या ४८ तासांच्या आत शालेय शुल्क तपासणी पथक नेमण्यात यावे. या पथकाने पुढील चार दिवसात आपली तपासणी पूर्ण करून आपल्याकडे अहवाल सादर करावा.
कोल्हापूर : शिक्षण उपसंचालकांच्या आदेशाची अंमलबजावणी करत येत्या ४८ तासांच्या आत शालेय शुल्क तपासणी पथक नेमण्यात यावे. या पथकाने पुढील चार दिवसात आपली तपासणी पूर्ण करून आपल्याकडे अहवाल सादर करावा.
अन्यथा पालकांसमवेत आम आदमी पार्टीच्यावतीने घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी बुधवारी दिली. त्याबाबतचे निवेदन त्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना दिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांची ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. त्यामुळे शाळांचे शिकवणी व्यतिरिक्त इतर खर्च कमी झाले आहेत. काही शाळा पालकांकडून अवाजवी शालेय शुल्काची मागणी करत आहे. अशाप्रकारच्या वसुलीला आळा घालण्यासाठी शालेय शुल्क तपासणी टास्कफोर्स नेमावा, अशी मागणी आपने शिक्षण उपसंचालकांकडे केली होती.
याला प्रतिसाद देत त्यांनी शालेय शुल्क तपासणी पथक नेमण्याचे आदेश दि. ८ जुलैला दिले होते. त्याबाबत ह्यआपह्णच्या शिष्टमंडळाने बुधवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी लोहार यांची भेट घेतली. शालेय शुल्क तपासणी पथकाने सादर केलेल्या अहवालात ज्या शाळा नियमबाह्य शालेय शुल्क वसूल करत आहेत. त्यांना ती वसुली थांबण्याचे लिखित आदेश व्हावेत. ज्या शाळांनी असे शुल्क वसूल केले आहे. ते पालकांना परत देण्यात यावे, आदी मागण्या शिष्टमंडळाने केल्या.
यावेळी उत्तम पाटील, अमरजा पाटील, संतोष घाटगे, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, विजय हेगडे, दिलीप पाटील, राज कोरगावकर, बसवराज हदीमनी, रविराज पाटील आदी उपस्थित होते.
स्पष्ट आदेश द्यावेत
राज्य शासनाने आरटीई प्रतिपूर्ती रक्कम आठ हजार रुपये प्रति विद्यार्थी निश्चित केल्याने प्रवेश देणाऱ्या शाळा वरील फरक पालकांकडे मागणी करत आहेत, अशी मागणी करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी देसाई यांनी केली.