कागल तालुक्यातील हळदीमध्ये भरली शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:16 AM2021-07-09T04:16:11+5:302021-07-09T04:16:11+5:30
कोल्हापूर : शासनाने कोरोनामुक्त ग्रामीण भागामध्ये पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यास मार्गदर्शक सूचना ...
कोल्हापूर : शासनाने कोरोनामुक्त ग्रामीण भागामध्ये पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यास मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करत प्रत्यक्ष अध्यापन सुरू करण्याची तयारी कोल्हापूर जिल्ह्यातील ९४३ शाळांनी दर्शविली असून, त्याबाबत शिक्षण विभागाला कळविले आहे. त्यातील हळदी (ता. कागल) येथील श्री. चौंडेश्वरी हायस्कूलमधील इयत्ता पाचवी ते दहावीचे वर्ग कोरोनाच्या नियमांचे पालन करत सुरू झाले आहेत.
या हायस्कूलमध्ये हळदी, बेनिक्रे, करंजीवणे, हळदवडे या गावांतून एकूण ३७५ विद्यार्थी येतात. त्यांचे वर्ग सुरू करण्यासाठी या चारही गावांच्या ग्रामपंचायतीकडून मंजुरीपत्र घेतले. या विद्यार्थ्यांच्या पालकांची संमतिपत्रही घेण्यात आली. त्यानंतर जूनच्या अखेरच्या आठवड्यात वर्ग प्रत्यक्षात सुरू केले आहेत. सॅनिटायझर, मास्क, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग, एका बेंचवर एक विद्यार्थी असे कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यात अडचणी असल्याने प्रत्यक्षात वर्ग भरविण्याचा निर्णय घेऊन शासन नियमानुसार कार्यवाही केली आहे. त्यासाठी पालक, ग्रामस्थ, शिक्षक, कर्मचारी आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे मुख्याध्यापक जी. के. भोसले यांनी गुरुवारी सांगितले.
चौकट
काही वर्ग नियमित, तर काही सम-विषम
इयत्ता पाचवी, आठवी, दहावीचे वर्ग नियमितपणे, तर सहावी, सातवी, नववीचे वर्ग सम आणि विषम पद्धतीने भरविण्याचे नियोजन केले आहे. वर्गांची वेळ सकाळी अकरा ते दुपारी चार अशी आहे. सकाळी आठ ते दहापर्यंत शिष्यवृत्ती, एनएमएसचे जादा तास घेतले जात असल्याचे मुख्याध्यापक भोसले यांनी सांगितले.
फोटो (०७०७२०२१-कोल-चौंडेश्वरी हायस्कूल ०१, ०२, ०३, ०४) : हळदी (ता. कागल) येथील श्री. चौंडेश्वरी हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीचे वर्ग कोरोनाच्या नियमांचे पालन करून सुरू झाले आहेत. या वर्गांमध्ये एकूण ३७५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.