Kolhapur News: खाऊला पैसे दिले नाहीत म्हणून शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 04:43 PM2023-02-02T16:43:24+5:302023-02-02T16:44:02+5:30
अतिदक्षता विभागात उपचार सुरू
कोल्हापूर : खाऊसाठी मागितलेले पैसे देण्यास वडिलांनी टाळाटाळ केल्याच्या रागातून शालेय मुलीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आरडेवाडी (ता. करवीर) येथे बुधवारी (दि. १) सकाळी घडली. धनश्री नामदेव पाटील (१४, रा. आरडेवाडी) असे अत्यवस्थ मुलीचे नाव आहे. तिच्यावर सीपीआरमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरडेवाडी येथील नामदेव पाटील हे शेती आणि गवंडीकाम करतात. बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या पाटील यांना चार मुली आणि मुलगा आहे. त्यांची तिसऱ्या क्रमांकाची मुलगी धनश्री नववीत शिकते. बुधवारी सकाळी शाळेत जाण्यापूर्वी तिने वडिलांकडे खाऊसाठी पैसे मागितले. मात्र, आत्ता लगेच नाही, तुला नंतर पैसे देतो, असे वडिलांनी सांगितले. पैसे मिळाले नाहीत, या रागातून धनश्रीने सकाळी १० वाजेच्या सुमारास घरात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
हा प्रकार लक्षात येताच नातेवाइकांनी अत्यवस्थ अवस्थेतील धनश्री हिला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिसांनी धनश्री आणि तिच्या वडिलांचा जबाब नोंदवला आहे.