शाळकरी मुलींवर अत्याचार : क्रीडा शिक्षकास आजन्म कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 11:16 AM2019-08-29T11:16:44+5:302019-08-29T11:20:26+5:30

हॉकी संघामध्ये सहभागी करून घेण्याचे आमिष दाखवून नववीमध्ये शिकणाऱ्या चार मुलींवर अत्याचार केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी नराधम आरोपी क्रीडा शिक्षक विजय विठ्ठल मनुगडे (वय ३८, रा. कपिलेश्वर, ता. राधानगरी, सध्या रा. देवकर पाणंद) आजन्म कारावास (जन्मठेप) व चार लाख रुपये दंडाची शिक्षा बुधवारी ठोठावली.

School girls tortured: Sports teacher imprisoned | शाळकरी मुलींवर अत्याचार : क्रीडा शिक्षकास आजन्म कारावास

शाळकरी मुलींवर अत्याचार : क्रीडा शिक्षकास आजन्म कारावास

googlenewsNext
ठळक मुद्देशाळकरी मुलींवर अत्याचार : क्रीडा शिक्षकास आजन्म कारावासचार लाखांचा दंड : दोन वर्षांनी पीडित मुलींना अखेर न्याय

कोल्हापूर : हॉकी संघामध्ये सहभागी करून घेण्याचे आमिष दाखवून नववीमध्ये शिकणाऱ्या चार मुलींवर अत्याचार केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी नराधम आरोपी क्रीडा शिक्षक विजय विठ्ठल मनुगडे (वय ३८, रा. कपिलेश्वर, ता. राधानगरी, सध्या रा. देवकर पाणंद) आजन्म कारावास (जन्मठेप) व चार लाख रुपये दंडाची शिक्षा बुधवारी ठोठावली. सरकारी वकील अ‍ॅड. अमिता कुलकर्णी व मंजूषा पाटील यांनी काम पाहिले. लैंगिक अत्याचार प्रकरणात क्रीडा शिक्षकाला आजन्म कारावासाची शिक्षा होण्याची पश्चिम महाराष्ट्रातील  ही पहिलीच घटना आहे.

या प्रकरणी १८ आॅगस्ट २०१७ ला मनुगडे याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरोधात बलात्कार (३७६), विनयभंग (३५४ अ ५०६), लहान मुलांचा लैंगिक अत्याचार कायदा (पोक्सो) कलम २०१२ चे ३ (ए), ५ (एफ), ६ ते १२ (एल) प्रमाणे गुन्हा दाखल केला. तपास पूर्ण करून दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले होते.

खटल्याची पार्श्वभूमी अशी, राजेंद्रनगरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विजय मनुगडे हा तेरा वर्षांपासून क्रीडा शिक्षक होता. तो हॉकीचा विशेष प्रशिक्षक असल्याने जिल्हा, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर मुला-मुलींना प्रशिक्षण देत होता. नववीत शिकणाऱ्या चार पीडित मुलींना हॉकीचे प्रशिक्षण देत असताना त्याने त्यांच्याशी जवळीक साधली व त्यांच्याशी अश्लील वर्तन केल्याची तक्रार होती.

हॉकी संघामध्ये निवड करण्याचे आमिष दाखवून त्याने चारही मुलींवर शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरील शिकवणी रूममध्ये नेऊन अत्याचार केला. त्यानंतर कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने शाळेच्या वेळेत आपल्या देवकर पाणंद येथील फ्लॅटवर नेऊन अत्याचार केला. पाच ते सहावेळा या मुलींवर अत्याचार झाला होता.

अत्याचारावेळी चारही मुलींचे त्याने मोबाईलमध्ये फोटो घेतले होते. या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर तुमचे बाहेर मित्रांसोबत संबंध आहेत, असे सांगून हॉकी खेळणे बंद करेन, अशी धमकी दिली. या चारही मुली एकमेकींच्या मैत्रिणी असल्याने तो नेहमी जबरदस्ती करून अत्याचार करत असे अशीही तक्रार होती.

खटल्याची सुनावणी दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश पाटील यांचेसमोर सुरू होती. सरकारी वकील अमिता कुलकर्णी, मंजुषा पाटील यांनी पीडित मुली, वडील, नातेवाईक, शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, संशयितांच्या घराशेजारील लोक असे ३० साक्षीदार तपासले. समोर आलेले पुरावे, साक्षी, सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी मनुगडे याला न्यायालयाने आजन्म कारावासाची (मरेपर्यंत) शिक्षा सुनावली.

निकालानंतर त्याची सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करून कळंबा कारागृहात रवानगी केली. पैरवी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संगीता पाटील, हवालदार संदीप आबिटकर, कॉन्स्टेबल चिले, शिंगे यांचे सहकार्य लाभले.

अटक ते शिक्षा

नराधम मनुगडे याला १८ आॅगस्ट २०१७ला अटक झाली. त्यानंतर त्याने जामीन मिळण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न केले. परंतु न्यायालयाने त्याचे अर्ज फेटाळून लावले. बुधवारी त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. अटकेनंतर त्याला थेट शिक्षाच झाली.

असा झाला उलगडा

चार मुलींपैकी एका मुलीला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. शाळेला जाण्यास ती टाळाटाळ करू लागली. घरामध्ये कोणाशी न बोलता एकटीच बसणे, न जेवता झोपणे, असे विचित्र वागू लागल्याने आई-वडील घाबरले. त्यांनी तिला विश्वासात घेत विचारणा केली. बिथरलेली मुलगी आई-वडिलांना मिठी मारत मोठ्याने रडू लागली. काय झाले हे समजायला मार्ग नव्हता.

तासाभरानंतर ती शांत झाली; तेव्हा वडिलांनी ‘बाळ, तू घाबरू नकोस, आम्ही तुझ्यासोबत आहे,’ असा धीर दिल्यानंतर तिने तोंड उघडले. तिची हकीकत ऐकून आई-वडिलांना धक्काच बसला. तिच्याबरोबर अन्य तीन मैत्रिणींच्या आई-वडिलांना बोलावून घेतले. त्यानंतर मनुगडेचे पितळ उघडकीस आले.

पश्चात्ताप नाही

नराधम मनुगडे याला राजारामपुरी पोलिसांनी कळंबा कारागृहातून सकाळी दहा वाजता ताब्यात घेतले. तेथून जिल्हा न्यायालयात आणले. न्यायालयात अंतिम सुनावणी व निर्णय देण्याचे कामकाज सुरू असताना बिनदिक्कतपणे तो उभा होता. जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेश नव्हता. तो अविवाहित असून, देवकर पाणंद येथील फ्लॅटवर एकटाच राहात होता. पस्तीस वर्ष उलटूनही त्याने लग्न केले नव्हते.


शाळकरी मुलींवर अत्याचार झाल्याची घटना गंभीर होती. आरोपीला शिक्षा होईल त्यादृष्टीने सखोल तपास करून भक्कम पुरावे गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
नवनाथ घोगरे
पोलीस निरीक्षक, राजारामपुरी पोलीस ठाणे

Web Title: School girls tortured: Sports teacher imprisoned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.