सामाजिक संस्थांच्या दातृत्वाने बहरेल ‘गर्जन’ची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:23 AM2018-02-15T00:23:19+5:302018-02-15T00:23:38+5:30
राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ऊसतोड मजूर, वीटभट्टीवर काम करणाºया पालकांच्या मुलांना शैक्षणिक आधार असलेली करवीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गर्जन प्राथमिक शाळेने गुणवत्तेच्या जोरावर जिल्ह्यात वेगळा ठसा उमटविला आहे. शालेय पातळीवरील कोणत्याही स्पर्धेत अव्वल स्थानी राहणाºया शाळेची भौतिक सुविधांच्या डळमळीत पायावर वाटचाल सुरू आहे. अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडणाºया या शाळेला सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात दिला तर निश्चितच ही शाळा ‘राज्यातील मॉडेल शाळा’ म्हणून पुढे येईल. ५६ मुलीं व ५५ मुलांचे या शाळेत भवितव्य घडत आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांनी शाळेला समाजातून कांही मदत मिळावी यासाठी पुढाकार घेतला आहे.
कोल्हापूर शहरापासून साधारणत: ४० किलोमीटर अंतरावर करवीर तालुक्याच्या पश्चिमेकडे सातेरी डोंगराच्या कुशीत हे गाव वसले आहे. त्यात डोंगरकपारीत असलेल्या सावतवाडीतील ७०-८० कुटुंबांचा समावेश गर्जनमध्येच होतो. शेजारील गावांच्या तुलनेत येथे पिकाऊ क्षेत्र कमी असल्याने ऊसतोडणी, वीटभट्टीवर काम करणेच येथील बहुतांशी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यामुळे येथील कुटुंबप्रमुखांना पोटाच्या मागे लागावे लागते. त्याचा थेट परिणाम शिक्षणावर झालेला दिसतो; पण गेल्या चार-पाच वर्षांपासून मारुती लांबोरे हे मुख्याध्यापक शाळेत आले आणि त्यांनी शाळेचे चित्र पालटण्यास सुरुवात केली. लांबोरे रूजू झाले त्यावेळी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत केवळ ७० मुले होती. त्यांनी आपल्या सहकारी शिक्षकांबरोबरच गावकºयांना विश्वासात घेऊन मुलांच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले. परिसरातच चार इंग्लिश मीडियमच्या शाळा आहेत, त्यांना तोंड दिलेच पण भौतिक सुविधा नसताना केवळ गुणवत्तेच्या बळावर १११ पटसंख्या केली. विद्यार्थ्यांची रोज शंभर टक्के उपस्थिती असते. नियमितसह अप्रगत मुलांसाठी शाळेच्या वेळेशिवाय जादा तास घेऊन त्यांचा सराव घेतला जातो. सर्वच मुले ‘अ’ श्रेणीत उत्तीर्ण होतात. राष्टÑीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील तीन मुलांनी यश संपादन केले. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच खेळ व सांस्कृतिक स्पर्धांतही शाळा मागे नाही. कबड्डीसह इतर खेळांत तालुका व जिल्हा पातळीवर खेळाडूंनी आपला ठसा उमटविला आहे. सुविधांची वानवा असताना मुलांची प्रगती नेत्रदीपक आहे. ग्रामस्थांनी आपल्यापरिने मदत गोळा करून डागडुजी केली, पण ही मदत तोगडी पडत आहे.
येथील गुणवत्तेला भौतिक सुविधांची जोड मिळाली तर आगामी काळात गर्जनची शाळा राज्यातील प्राथमिक शिक्षणक्षेत्रात मॉडेल ठरेल. फक्त त्यासाठी सामाजिक संस्था व समाजातील दानशूर व्यक्तीचा मदतीचा हात पुढे येण्याची खरी गरज आहे.
दृष्टिक्षेपात गर्जन-
कुटुंबे - २२५ (सावतवाडी ७०)
लोकसंख्या - १२५२
साक्षरतेचे प्रमाण - ६५ टक्के
शिक्षणाची सुविधा -
आठवीपर्यंत
व्यवसाय - मजुरी
मुख्याध्यापकांकडून मुलांना पोहण्याचे धडे
लांबोरे शाळेत आल्यापासून जोखीम घेऊन दरवर्षी दि. १५ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत मुलांना तुळशी नदीत पोहण्याचे धडे देतात. त्यामुळे पहिलीचा वर्ग वगळता सर्वच विद्यार्थी (मुलींसह) पट्टीचे पोहणारे आहेत. नियमित व्यायामामुळे विद्यार्थ्यांही चुणचुणीत आहेत.