शाळा ऑनलाइन, फी मात्र शंभर टक्के!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:16 AM2021-06-21T04:16:44+5:302021-06-21T04:16:44+5:30
यावर्षी शैक्षणिक शुल्क आकारणीबाबत राज्य शासनाने स्पष्ट आदेश दिलेले असतानादेखील जिल्ह्यातील काही शाळांकडून पालकांकडे शुल्काबाबत आग्रह केला जात आहे. ...
यावर्षी शैक्षणिक शुल्क आकारणीबाबत राज्य शासनाने स्पष्ट आदेश दिलेले असतानादेखील जिल्ह्यातील काही शाळांकडून पालकांकडे शुल्काबाबत आग्रह केला जात आहे. शुल्क भरल्यानंतरच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची लिंक पाठविणे. त्यांना शाळेच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट करणे, आदी प्रकार करण्यात येत आहे. कोरोनामुळे ऑनलाइन पध्दतीनेच शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शाळेच्या अन्य खर्चात बचत झाल्याने शुल्कामध्ये सवलत देण्याची मागणी पालकांकडून होत आहे. प्रत्यक्षात शाळा भरत नसली, तरी ऑनलाइन शिक्षणासाठीची यंत्रणा उभारण्यासह ती योग्य पध्दतीने चालविण्यासाठी खर्च येतो. ते लक्षात घेऊन पालकांनी शुल्क भरून आम्हाला सहकार्य करावे, असे संस्था चालकांकडून सांगण्यात येत आहे. हे दोन्ही घटक आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने जिल्ह्यात सध्या शुल्क आकारणीचा मुद्दा तापला आहे. काही संघटनांनी पालक, विद्यार्थ्यांच्या बाजूने उभारत शुल्क आकारणीबाबत शाळांनी पालकांवर सक्ती करू नये, अशी मागणी शिक्षण विभागाकडे केली आहे.
पॉंईंटर
जिल्हा परिषद शाळा : ३०२७
महापालिका शाळा : ५८
खासगी अनुदानित शाळा : ७६
खाजगी विनाअनुदानित शाळा : ३४५
ऑनलाइन शाळांमुळे वाचतो खर्च
ऑनलाइन शाळांमुळे वीज, पाणी, वर्ग खोल्यांची दैनंदिन साफसफाई, स्कूल बस, प्रयोगशाळा, आदी स्वरूपातील खर्चामध्ये बचत झाल्याचे पालकांकडून सांगितले जात आहे. ऑनलाइन शाळा सुरू असली, तरी इमारतीची देखभाल-दुरुस्ती, साफसफाई करावी लागते. ऑनलाइन शिक्षणाची यंत्रणा राबविण्यासाठी खर्च करावा लागला असल्याचे संस्थाचालकांकडून सांगण्यात येत आहे.
शंभर टक्के फी कशासाठी?
यावर्षी ऑनलाइन शिक्षण देण्यात येणार आहे. शाळेच्या अन्य खर्चात बचत होणार आहे. त्यामुळे शाळांनी शंभर टक्के फी आकारणी करू नये.
-आफ्रीन अत्तार, पालक.
कोरोनामुळे आर्थिक बजेट कोलमडले आहे. ऑनलाइन शिक्षण देण्यात येणार असेल,तर शंभर टक्के फी आकारणी करण्याची गरज काय? यावर्षी शाळांनी फी मध्ये सवलत द्यावी.
-प्रमोद पाटील, पालक.
शाळा ऑनलाईन असली, तरी खर्च येतोच
शाळांमध्ये ऑनलाईन पध्दतीने शिकविण्यात येत आहे. शिक्षक, कर्मचाऱ्यांचा पगार, इमारतींची देखभाल आणि साफसफाई, आदी खर्च थांबलेला नाही. काही विद्यार्थ्यांचे गेल्यावर्षीचे शुल्क अद्याप मिळालेले नाही. गरजू-गरीब विद्यार्थ्यांना सवलत दिली आहे. पालकांनी शुल्क देऊन सहकार्य करावे.
-के. डी. पाटील, जिल्हाअध्यक्ष, इंग्लिश मीडियम स्कूल ट्रस्टीज असोसिएशन.
कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन आम्ही यावर्षी शुल्कवाढ केलेली नाही. शाळा प्रत्यक्षात भरत नसल्या, तरी ऑनलाइन शिक्षण देण्याचा खर्च सुरूच आहे. शुल्कातून जमा होणाऱ्या रकमेतून शाळांचा खर्च चालतो. ते लक्षात घेऊन पालकांनी शुल्क देऊन आम्हाला आधार द्यावा.
-महेश पोळ, अध्यक्ष, इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन
===Photopath===
200621\20kol_4_20062021_5.jpg
===Caption===
डमी (२००६२०२१-कोल-स्टार ८२७ डमी)