कोल्हापूरकरांच्या दातृत्वामुळे थांबली दुर्गम भागातील मुलींची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 11:02 AM2021-12-03T11:02:39+5:302021-12-03T11:07:49+5:30
दुर्गम आणि ग्रामीण भागात असणाऱ्या शाळेसाठी मुलांची रोज तीन किलोमीटरपेक्षा अधिक पायपीट होत होती .सायकल मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता.
संदीप आडनाईक
कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात असणाऱ्या शाळेसाठी रोज तीन किलोमीटरपेक्षा अधिक अंतर चालत जाणाऱ्या शाळकरी मुलांची पायपीट कोल्हापूर आणि इचलकरंजीकरांच्या दातृत्वामुळे आता थांबणार आहे. कसबा तारळे येथील भोगावती सांस्कृतिक मंडळ संचलित पु. शि. (तथा) काका आठवले विद्यार्थी वसतिगृहाच्या पुढाकाराने राधानगरी तालुक्यातील सहा वाड्यांमधील सुमारे २५ जणांना ही सायकल भेट मिळाली. त्यामध्ये २१ मुलींचा समावेश आहे. सायकल मिळाल्यामुळे त्यांच्या तोंडावर दिसणारा आनंद अवर्णनीय होता.
राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथील कसबा तारळे भोगावती सांस्कृतिक मंडळ संचलित पु. शि. (तथा) काका आठवले विद्यार्थी वसतिगृहाच्या माध्यमातून परिसरातील दुर्गम आणि ग्रामीण भागाचा मार्च २०२० मध्ये आवश्यकता पडताळणी सर्वेक्षण करण्यात आला होता. त्यात दळणवळणाच्या साधनांचा अभाव असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना हायस्कूलसाठी रोज तीन किलोमीटरपेक्षा जास्त अंतर चालत जावे लागत असल्याचे निदर्शनास आले.
ही पायपीट थांबवण्यासाठी यावर्षी संस्थेमार्फत ‘सायकल भेट अभियान’ राबविण्यात आले. या अभियानासाठी कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरातील नागरिकांना जुन्या वापरात नसलेल्या पण सुस्थितीतील सायकल देणगी स्वरूपात देण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला शहरवासीयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने सप्टेंबर २०२१ अखेर एकूण पंचवीस सायकल, आवश्यक ती दुरुस्ती करून, भेट स्वरूपात विद्यार्थ्यांना देण्यात आल्या.
तालुक्यातील जोंधळेवाडी व आपटाळ येथील कार्यक्रमात वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी विशाल माळी, अतिरिक्त सरकारी वकील अमित महाडेश्वर यांच्या हस्ते या सायकलींचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी एम. डी. पाटील, पांडुरंग भोसले, माधव ठाकूर आणि व्यवस्थापक श्रीकांत वष्ट उपस्थित होते. या अभियानाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे कार्यकर्ते कृष्णराव माळी, सागर कवडे आणि तानाजी माळी यांनी विशेष प्रयत्न केले.
दुसऱ्या टप्प्यात आणखी ४० सायकली देणार
- पहिल्या टप्प्यात ६ वाड्यांमधील २५ विद्यार्थ्यांना या सायकली देण्यात आल्या. त्यामध्ये २१ विद्यार्थिनींचा समावेश होता.
- वसतिगृहामार्फत सायकल भेट अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये डिसेंबर महिन्यात उर्वरित दुर्गम वाड्यांमधील विद्यार्थ्यांना ३० ते ४० सायकल देण्याची संस्थेची योजना आहे.