Kolhapur: खड्ड्यात पडून शाळकरी विद्यार्थी गंभीर जखमी, जलवाहिनीची गळती काढण्यासाठी काढला होता खड्डा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 14:19 IST2023-10-05T14:18:53+5:302023-10-05T14:19:58+5:30
नागरिकांमधून तीव्र संताप

Kolhapur: खड्ड्यात पडून शाळकरी विद्यार्थी गंभीर जखमी, जलवाहिनीची गळती काढण्यासाठी काढला होता खड्डा
अमर पाटील
कळंबा : कळंबा-गारगोटी राज्यमार्गावर वाहतुकीच्या वर्दळीच्या रस्त्यावर एका सांस्कृतिक कार्यालयासमोर जलवाहिन्याच्या गळत्या काढण्यासाठी कळंबा ग्रामपंचायत प्रशासनाने काढलेल्या खड्ड्यात पडून शाळकरी विद्यार्थी गंभीर जखमी झाला. अनुष रवींद्र पाटील असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. अनुषच्या ओठात दात घुसला तर नाक फ्रॅक्चर होऊन डोळ्यास इजा झाली. काल, बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.
कळंबा येथील राम गल्लीत शहर वृत्तपत्र विक्रेते रवींद्र पाटील कुटुंबियांसमवेत राहतात. त्यांचा मुलगा अनुष शहरातील शाळेत दहावीत शिकत असून बुधवारी सायंकाळी खासगी क्लासमधून सायकल वरून घरी येत होता. अंधारात खड्डा न दिसल्याने खड्ड्यात पडून तो गंभीर जखमी झाला. खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
जलवाहिनीतील गळती काढण्यासाठी तीन दिवसांपूर्वी कळंबा ग्रामपंचायत प्रशासनाने मोठा खड्डा काढला आहे. याठिकाणी सुरक्षिततेसाठी बरेकेट्स उभे केले नव्हते. खड्ड्या नजीक पथदिवे नसल्याने रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले होते. याठिकाणी अनेक प्रवासी पडून किरकोळ जखमी झाले आहेत. तरी देखील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. यातच आता शाळकरी मुलगा जखमी झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.