रविवार ठरला शालेय साहित्य खरेदीचा वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 02:55 PM2019-06-17T14:55:27+5:302019-06-17T14:59:18+5:30
कोल्हापूर : मराठी माध्यमाच्या सर्व प्राथमिक शाळा आज सोमवारपासून सुरू झाल्या. शाळेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी रविवार शेवटचा दिवस असल्याने ...
कोल्हापूर : मराठी माध्यमाच्या सर्व प्राथमिक शाळा आज सोमवारपासून सुरू झाल्या. शाळेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी रविवार शेवटचा दिवस असल्याने सुट्टीचे औचित्य साधून पालकांनी पाल्यासह बाजारपेठ गाठल्याने एकच झुंबड उडाल्याचे चित्र होते.
कोल्हापूर शहरात रविवार बाजारचा दिवस असल्याने, तर दुकाने शालेय साहित्यांनी भरून गेली होती. इतर लहान-मोठी दुकाने व मॉलही हाऊसफुल्ल झाले होते. यावर्षी साहित्यात किमान १0 टक्के दरवाढ झाली असतानाही बऱ्याच दुकानांमध्ये आॅफर असल्याने गर्दी दिसत होती.
जिल्हा परिषद व महापालिका शाळांमधील आठवीपर्यंतच्या मुलांना पाठ्यपुस्तके शाळेतच मिळतात. हा पालकांना मोठा दिलासा आहे; पण त्यांना वह्या, पेनसह इतर स्टेशनरी साहित्य खरेदी करावे लागते. वर्षभर लागणारे साहित्य एकदमच खरेदी करावे लागत असल्याने त्याचे सेट घेण्याकडेच अनेकांचा कल असतो. वह्यांमध्येही होलसेल दराने विक्री होणाऱ्या दुकानांमध्ये जास्त गर्दी दिसत होती.
महापालिकेच्या मागील बाजारगेट, महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी, राजारामपुरीत येथे खरेदीला पसंती दिली जाते. इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोमवारी (दि. १0) सुरू झाल्याने त्यांची खरेदी बऱ्यापैकी संपली आहे.
पुस्तके, वह्या, स्टेशनरी यांच्या जोडीने नवीन दफ्तर दरवर्षी घेतले जाते; त्यासाठी वेगवेगळ्या आकारांतील आकर्षक स्कूल बॅग्ज खरेदी करण्याकडे पालकांचा कल आहे. पावसाळा असल्याने पावसात दफ्तर भिजू नये अशाच स्कूलबॅग्जना जास्त मागणी आहे.
लक्ष्मीपुरी व महाद्वार रोडवर स्कूल बॅग्ज, सॅकमध्ये भरघोस सूट दिल्याचेही बोर्ड झळकत आहेत. याशिवाय रेनकोट आणि छत्र्यांची खरेदीही आताच करून ठेवली जात आहे. यावर्षी सर्वच शालोपयोगी साहित्यांमध्ये दरवाढ दिसत आहे.
लक्ष्मीपुरीतील हत्तीमहाल मार्गावर कमी किमतीत वह्या-पुस्तकांसह स्टेशनरी, स्कूलबॅग्ज सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात उपलब्ध असतात. रविवारी आठवडा बाजार असल्याने येथे साहित्य खरेदी करण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली होती. येथे नेहमीच कमी दरात साहित्य उपलब्ध होत असल्याने येथे खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त असते. हा बाजार गोरगरिबांसाठी मोठा आधारच आहे. आजूबाजूच्या खेड्यांतील लोकही येथे खरेदीसाठी येतात.