'राजाराम' बंधाऱ्यात शाळकरी मुलगा बुडाला, एकाला वाचवण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 06:35 PM2020-10-20T18:35:46+5:302020-10-20T18:38:03+5:30
dam, accident, kolhapurnews कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेला एक बारा वर्षाचा शाळकरी मुलगा बुडाला. तर त्याच्या मित्राला वाचवण्यात राजाराम बंधारा ग्रुपच्या कार्यकर्त्यांना यश आले. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बुडालेल्या मुलाचा अग्निशमन दलाच्या जवानांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांबळे यांनी शोध घेतला. पण तो आढळून आला नाही.
कसबा बावडा : येथील राजाराम बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेला एक बारा वर्षाचा शाळकरी मुलगा बुडाला. तर त्याच्या मित्राला वाचवण्यात राजाराम बंधारा ग्रुपच्या कार्यकर्त्यांना यश आले. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बुडालेल्या मुलाचा अग्निशमन दलाच्या जवानांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांबळे यांनी शोध घेतला. पण तो आढळून आला नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी: संस्कार राहुल कुरणे (वय १२ ) रा.कदमवाडी व त्याचा मित्र नजीब नियाज ट्रेनर हे दोघे गेल्या तीन दिवसांपासून घरात आम्ही बाहेर खेळायला जातो असे खोटे सांगून राजाराम बंधारा येथे आंघोळीसाठी येत होते.
जोरदार वाहणार्या पंचगंगा नदीतील वाहत्या पाण्याचा या दोघांनाही अंदाज आला नाही. वाहत्या प्रवाहा बरोबरच संस्कार हा बंधाऱ्यातून वाहून गेला. त्याच्या पाठोपाठ नजीब ही वाहतच चालला होता. पण येथे दररोज आंघोळीसाठी येत असलेल्या राजाराम बंधाऱ्याचे सदस्य जीतू केंबळे यांनी त्याला हाताला धरून पाण्याबाहेर काढले.
दरम्यान बंधाऱ्याच्या मोरीतून वाहत गेलेल्या संस्कार ला वाचवण्यासाठी नदीत पोहण्यासाठी आलेले राजाराम बंधारा या ग्रुपचे सदस्य संतोष गायकवाड, रावसाहेब शिंदे, जितू केंबळे, हनुमंत सूर्यवंशी यांनी शर्तीचे प्रयत्न केले पण संस्कार वाहत पुढे पुढे जात होता. ठराविक अंतर पुढे गेल्यानंतर तो पाण्यात बुडाल्याने दिसायचा बंद झाला.
त्याचा शोध आज दिवसभर अग्निशामक दलाचे जवान तसेच सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांबळे यांनी बोटीच्या सहाय्याने घेतला. मात्र आढळून आला नाही. संस्कार हा इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होता. त्याच वडील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहेत.
दरम्यान राजाराम बंधाऱ्यात मुलगा बुडाल्याच्या घटनेची माहिती सोशल मीडिया वरून वायरल झाल्याने बंधाऱ्यावर लोकांनी खूप गर्दी केली होती. संस्कार च्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे.