कोल्हापूर विभागातील शाळा २७ नोव्हेंबरला राहणार बंद : डी. बी. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:54 PM2018-10-27T12:54:33+5:302018-10-27T12:56:59+5:30
पवित्र पोर्टलमधील अन्यायकारक तरतुदींविरोधात आणि विविध मागण्यांसाठी कोल्हापूर विभागातील शाळा दि. २७ नोव्हेंबरला बंद ठेवण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघाने घेतला आहे. या आंदोलनात सर्व शाळा, संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांनी येथे केले.
कोल्हापूर : पवित्र पोर्टलमधील अन्यायकारक तरतुदींविरोधात आणि विविध मागण्यांसाठी कोल्हापूर विभागातील शाळा दि. २७ नोव्हेंबरला बंद ठेवण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघाने घेतला आहे. या आंदोलनात सर्व शाळा, संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांनी येथे केले.
येथील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसमध्ये कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघाची बैठक झाली. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील म्हणाले, विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आपल्याला लढा देणे आवश्यक आहे. या लढ्यातील एक टप्पा म्हणून दि. २७ नोव्हेंबरला कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
यश मिळविण्याच्या निर्धाराने हा लढा आपल्याला द्यावयाचा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लीगल अॅडव्हायझर महामंडळाचे जी. एस. सामंत म्हणाले, विविध मागण्यांसाठीच्या या आंदोलनात सर्व संस्थाचालकांनी उतरणे आवश्यक आहे. पवित्र पोर्टलवर माहिती भरू नये.
प्रताप माने म्हणाले, सरकारची भूमिका आपल्याविरोधात आहे. शिक्षणाची चळवळ वाचविण्यासाठी आपल्याला मोठी लढाई करावी लागणार आहे. एस. एन. माळकर म्हणाले, बेमुदत शाळा बंद केल्याशिवाय आता पर्याय नाही. लोकप्रतिनिधी, पालक, शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनांना बरोबर घेऊन आपण आंदोलन करण्याची गरज आहे.
या बैठकीत जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष व्ही. जी. पोवार, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव युवराज भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कोल्हापूर शहर, करवीर, कागल, गगनबावडा तालुक्यातील शिक्षण संस्थाचालक उपस्थित होते.
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे उपाध्यक्ष आर. डी. पाटील यांनी स्वागत केले. शिक्षण संस्था संघाचे सचिव प्रा. जयंत आसगावकर यांनी प्रास्ताविक केले. सी. एम. गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विरेंद्र वडेर यांनी आभार मानले.
मागण्या अशा
- पवित्र पोर्टलमधील अन्यायकारक तरतुदी रद्द कराव्यात.
- शिक्षक भरतीबाबतचे संस्थाचालकांचे अधिकार पूर्वीप्रमाणे कायम ठेवावेत.
- जुनी पेन्शन योजना लागू करावी.
- वीस टक्के अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे.
- अघोषित शाळा, महाविद्यालयांना निधीसह घोषित करावे.
शुक्रवारच्या आंदोलनात सहभाग नाही
शाळांमध्ये परीक्षा असल्याने दि. २ नोव्हेंबरच्या बंदमध्ये कोल्हापूर विभाग सहभागी होणार आहे. त्याऐवजी दि.२७ नोव्हेंबरला शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रा. गायकवाड यांनी सांगितले.