शाळा सुरू, महाविद्यालये मात्र बंदच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:10 AM2021-02-05T07:10:48+5:302021-02-05T07:10:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीच्यापाठोपाठ गेल्या आठवड्यापासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू झाले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीच्यापाठोपाठ गेल्या आठवड्यापासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू झाले. मात्र, कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेची १२१ महाविद्यालयांतील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग अद्याप बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण घेण्यात मर्यादा येत असल्याने शैक्षणिक नुकसान होण्याची भीती विद्यार्थ्यांना वाटत आहे. त्यामुळे महाविद्यालये त्वरित सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.
कोरोनामुळे गेल्या ११ महिन्यांपासून जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील वर्ग प्रत्यक्षात भरलेले नाहीत. ऑफलाईन पध्दतीने वर्ग सुरू आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात इयत्ता नववी ते बारावीचे, तर गेल्या आठवड्यापासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. शासनाच्या सूचनेनुसार शाळांना कोरोनाबाबतची आवश्यक दक्षता घेतली आहे. या वर्गांमधील विद्यार्थ्यांची उपस्थितीही चांगली आहे. त्यापार्श्वभूमीवर महाविद्यालयांतील वर्गही प्रत्यक्षात सुरू करण्याची मागणी विद्यार्थी आणि संघटनांकडून सातत्याने सुरू आहे. कोरोनाबाबतची दक्षता घेऊन वर्ग सुरू करण्यास हरकत नसल्याचे प्राचार्य, प्राध्यापक संघटनांचे म्हणणे आहे. शिवाजी विद्यापीठ आणि महाविद्यालयांची भूमिकाही सकारात्मक आहे. जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊन वर्ग सुरू करण्याची तयारी असल्याचे त्यांनी शासनाला कळविले आहे.
चौकट
१ लाख ९ हजार विद्यार्थी प्रतीक्षेत
जिल्ह्यात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ९ हजार ४२४ इतकी आहे. त्यात ५८,८९९ मुले, तर ५०,५२५ मुली आहेत. ऑनलाईन शिक्षण घेण्यातील अडचणींमुळे त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होण्याची भीती वाटत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी कॉलेज लवकर सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
प्रतिक्रिया
कोरोनामुळे बंद करण्यात आलेले उद्योग, व्यवसाय, जिम, मंदिरे आदी सुरू झाले आहे. मात्र, महाविद्यालये अद्याप बंद आहेत. विद्यार्थी हित लक्षात घेता महाविद्यालये लवकर सुरू करावीत.
- ऋषिकेश माळी, महानगरमंत्री, अभाविप.
सिनेमागृहे, हॉटेल असे सर्व काही पूर्ववत सुरू झाले आहे. त्यामुळे महाविद्यालयांतील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वर्ग सुरू करण्यास अडचण नाही. त्याबरोबर ग्रंथालय, अभ्यासिकादेखील सुरू कराव्यात.
- प्रशांत आंबी, राज्य सेक्रेटरी, एआयएसएफ.
बीएएलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षामध्ये मी शिक्षण घेत आहे. गेल्या सात महिन्यांपासून ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. अशा पध्दतीने काही मुद्दे समजून घेणे अडचणीचे ठरते. त्यामुळे वर्ग प्रत्यक्षात सुरू व्हावेत.
- रेवती पाटील, संभाजीनगर.
मी सध्या एम. ए. राज्यशास्त्र अभ्यासक्रमाच्या द्वीतीय वर्षात आहे. ऑनलाईन शिक्षण घेण्यात तांत्रिक, आकलनाच्या मर्यादा आहेत. त्यामुळे महाविद्यालयात ऑफलाईन पध्दतीने वर्ग भरविण्यात यावेत.
- सुधीर पाटील, सायबर चौक.
जिह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात
एकूण महाविद्यालये : १२१
एकूण विद्यार्थी संख्या : १,०९,४२४