राज्यातील सैनिकी शाळांचा दर्जा वाढणार !
By Admin | Published: December 11, 2015 11:16 PM2015-12-11T23:16:58+5:302015-12-12T00:11:59+5:30
समितीची स्थापना : अभ्यासक्रम सीबीएसई दर्जाचा होणार, शाळांची तपासणी करण्याचा निर्णय
राम मगदूम --गडहिंग्लज--राज्यातील सर्व सैनिकी शाळांची तपासणी करण्यासाठी व सैनिकी शाळांचा अभ्यासक्रम सीबीएसई दर्जाचा करण्यासाठी शासनाने खास समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे अभ्यासक्रमाबरोबरच या शाळांचा दर्जा वाढण्यास मदत होणार आहे.१९९६-९७ पासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक अशा तीस सैनिकी शिक्षण देणाऱ्या शाळा उघडण्यात स्वयंसेवी संस्थांना परवानगी देण्यात आली. त्या सर्व शाळांची तपासणी करून त्यांना प्रतवारी देण्याबरोबरच त्यांचा अभ्यासक्रम सीबीएसई दर्जाचा करून त्यांचा दर्जा वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यासाठीच ही समिती गठित करण्यात आली आहे.
शिक्षण आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये क्रीडा आयुक्त, प्राथमिक शिक्षण संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, एस.एस.सी. बोर्डाचे अध्यक्ष, सातारा सैनिकी स्कूलचे प्राचार्य, नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलचे कमांडंट, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे प्रतिनिधी, कर्नल सुधीर सावंत, एन.सी.सी. महाराष्ट्र ग्रुपचे कमांडंट, पुण्याच्या आर्मी पब्लिक स्कूलचे प्राचार्य, बुलडाण्याच्या राजीव गांधी मिलिटरी स्कूलचे सचिव विश्वनाथ माळी, सागरोळी-नांदेडच्या छत्रपती शाहू सैनिक शाळेचे सुनील देशमुख, दिल्लीच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी यांचा सदस्यांत समावेश आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सहसंचालक हे या समितीचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत. तीन महिन्यांत ही समिती शासनाला अहवाल सादर करणार आहे.