लाईट, रेंज नसलेल्या शाळांना मिळणार टॅब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:25 AM2021-03-10T04:25:42+5:302021-03-10T04:25:42+5:30
कोल्हापूर : ज्या शाळेमध्ये लाईट नाही आणि ज्या ठिकाणी इंटरनेटसाटी रेंज नाही अशा जिल्ह्यातील शाळांना जिल्हा परिषदेच्यावतीने टॅब ...
कोल्हापूर : ज्या शाळेमध्ये लाईट नाही आणि ज्या ठिकाणी इंटरनेटसाटी रेंज नाही अशा जिल्ह्यातील शाळांना जिल्हा परिषदेच्यावतीने टॅब पुरवण्यात येणार आहेत. यासाठीची २५ लाख रुपयांची निविदा सोमवारी काढण्यात आली आहे. या महिनाअखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हा परिषदेच्या शाळांना ई-लर्निंगचे साहित्य देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, डोंगराळ तालुक्यात वाड्या-वस्त्यांवरील अशा अनेक शाळा आहेत की ज्या ठिकाणी अजूनही लाईटची सोय नाही. तसेच ई-लर्निंगसाठी आवश्यक इंटरनेटची सुविधाही उपलब्ध नाही. अशा शाळांमधील विद्यार्थी आधुनिक शिक्षण पद्धतीपासून दूर राहू नयेत यासाठी जिल्हा परिषदेेने अशा शाळांना टॅब देण्याचा निर्णय घेतला. यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.
किती शाळांना टॅबची गरज आहे याची मागणी प्रत्येक तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आली आहे. त्यानुसार ३०९५ शाळांनी टॅबची मागणी केली आहे. या टॅबमध्ये शैक्षणिक अध्यापनासाठीचा सर्व कार्यक्रम उपलब्ध करून दिला जातो. यासाठी लाईट किंवा इंटरनेटची गरज नसते. केवळ टॅब चार्जिंग करणे हे महत्त्वाचे काम उरते. त्यामुळे अशा शाळांमध्ये हे टॅब उपयुक्त ठरणार आहेत.
चौकट
जिल्हावार शाळांची टॅब मागणी
शाहूवाडी २६, हातकणंगले ४९, कागल ८५३, शिरोळ ३४१, आजरा ३५, करवीर ४९, पन्हाळा २६५, चंदगड ६६, भुदरगड १९६, गगनबावडा ११४०, गडहिंग्लज ५१, राधानगरी ३३.
कोट
गगनबावडा तालुक्यात फिरतीसाठी गेलो असता या ठिकाणी लाईट आणि इंटरनेटची रेंज नसल्याने जिल्हा परिषदेचे विद्यार्थी शिक्षणाच्या आधुनिक पद्धतीपासून दूर राहात असल्याचे दिसून आले. त्यामुळे आता या टॅबच्या माध्यमातून त्यांना नवे दालन खुले होईल.
संजयसिंह चव्हाण
मुख्य कार्यकारी अधिकारी,
कोल्हापूर जिल्हा परिषद