विज्ञानाभिमुख समाजनिर्मिती आवश्यक
By admin | Published: March 1, 2017 12:32 AM2017-03-01T00:32:59+5:302017-03-01T00:32:59+5:30
शिवराम भोजे : ‘लोकमत बाल विकास मंच’च्या ‘विज्ञान यात्रा २०१७’चे उद्घाटन; आज शेवटचा दिवस
कोल्हापूर : समाजातील अपप्रवृत्ती नष्ट करण्यासाठी माणसांच्या विचारांमध्ये परिवर्तन झाले पाहिजे. त्यासाठी विज्ञानाभिमुख समाजाची निर्मिती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रख्यात अणुऊर्जा शास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांनी मंगळवारी केले.
राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून ‘लोकमत’ बालविकास मंच व ‘डाईस’तर्फे आयोजित दोनदिवसीय जिल्हास्तरीय ‘विज्ञान यात्रा २०१७’ या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
भोजे म्हणाले, आजचे युग खूप गतिमान झाले आहे. यात सर्वच गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांनी अद्ययावत राहिले पाहिजे. ‘लोकमत’च्या या उपक्रमामुळे मुलांच्या बौद्धिक क्षमता वाढण्यास नक्कीच वाव मिळेल.
देशाचा विकास करावयाचा झाल्यास संशोधन क्षमता वाढविण्याची गरज आहे, या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या शिकवणुकीला सार्थ ठरवीत छोट्या संशोधकांनी प्रदर्शनात मांडलेले प्रकल्प मोठ्यांनाही अचंबित करतील, असे ६० हून अधिक विज्ञान प्रकल्प मांडण्यात आले आहेत. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक डाइस अकॅडमी हे आहेत. विप्रास टेक्नोमार्ट, गुरुकृपा हस्ताक्षर सुधारणा वर्ग, स्मार्ट किड अबॅकस, अॅडव्हान्स्ड डेंटल केअर हे सहप्रायोजक आहेत, तर चाटे स्कूल व गुरमूर डेकोरेशनचे विशेष सहकार्य लाभले आहे.
उद्घाटनप्रसंगी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, ‘डाइस’च्या दिशा पाटील, चाटे शिक्षण समूहाचे कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा. भारत खराटे, अॅडव्हान्स्ड डेंटल केअरचे डॉ. अमोल जाधव, गुरुकृपा हस्ताक्षर सुधारणा वर्गच्या सुवर्णा कुलकर्णी, परदेशी प्लॅनेटोरियमच्या उदयश्री परदेशी, विप्रास टेक्नोमार्टचे प्रमोद सूर्यवंशी, स्मार्ट किड अबॅकस शार्दूल टिक्के यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फिरते ‘थ्री डी तारांगण’ पाहण्याची संधी
विज्ञान यात्रेसह डॉ. परदेशी प्लॅनेटोरियमच्या वतीने ‘नेहरू तारांगणा’च्या धर्तीवर विशेष शो दाखविले जात आहेत. यातील प्रत्येक शो ३० मिनिटांचा असून तो इंग्रजी व हिंदी या भाषांमध्ये आहे. याद्वारे अवघड खगोलशास्त्रीय कल्पना, सूर्यमाला, आकाशगंगा, ग्रहांचे भ्रमण, उल्कापात, ग्रहणे, इत्यादींची सखोल माहिती दाखविण्यात येते. तसेच याच रिअल टाईम थ्री-डी प्लॅनेटोरियममध्ये आपण प्रत्यक्ष अंतराळात आहोत, असा भास होत असल्याने हे पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
फायर फायटर रोबो
प्रदर्शनात स्वरूप पाटील या विद्यार्थ्याने फायर फायटर रोबोचा वापर करून आग कशी आटोक्यात आणता येईल, याचे प्रात्यक्षिक दाखविले आहे. कमी मनुष्यबळ असलेल्या आणि अतिधोकादायक ठिकाणी वेब कॅमेरा बसवून वायरलेस रिमोट कंट्रोलद्वारे कंट्रोल रूममध्ये बसून मानवविरहित उपकरण चालविता येते. यासह प्रदर्शनातील बहूपयोगी सायकल ही विशेष आकर्षण बनत आहे. सायकल चोरीला जाऊ नये म्हणून सेन्सर, कमी खर्चात मोटारसायकल चालविण्याची मजा, मोबाईल चार्ज करणे, सोलर लाईट अशी या सायकलीची वैशिष्ट्ये आहेत. जान्हवी आकुलवार या विद्यार्थिनीने तयार, टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेले नैसर्गिक कीटकनाशक आणि साक्षी मोरे हिने तयार केलेला घरगुती फॅन, कुलर ही या प्रदर्शनातील प्रमुख वैशिष्ट्ये बनली आहेत. यासह पर्जन्यजल संवर्धन, स्नायू ऊर्जेवर चालणारे वॉशिंग मशीन, इको-फ्रेंडली डिश वॉशर, आदी उपकरणे पाण्याच्या पुनर्वापरासह प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.
आज समारोप
‘लोकमत बाल विकास मंच’ व ‘डाईस’तर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित ‘विज्ञान यात्रा २०१७’चा आज, बुधवारी समारोप होणार आहे. या विज्ञान प्रदर्शनातील उपकरणाचे तज्ज्ञांमार्फत आज परीक्षण केले जाणार आहे.