‘अज्ञानेश्वर की विज्ञानेश्वर- विज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 10:41 PM2019-01-03T22:41:29+5:302019-01-03T22:41:42+5:30

एकविसावे शतक हे विज्ञानयुग असेल,’ असे म्हणत एकविसावे शतक आले. त्यातील दोन दशके संपतसुद्धा आली. यापूर्वी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारतवासीयांना आधुनिक, सशक्त, सामर्थ्यशाली भारताचे स्वप्न दाखविले.

'Science of ignorance- science | ‘अज्ञानेश्वर की विज्ञानेश्वर- विज्ञान

‘अज्ञानेश्वर की विज्ञानेश्वर- विज्ञान

googlenewsNext

- डॉ. व्ही. एन. शिंदे
एकविसावे शतक हे विज्ञानयुग असेल,’ असे म्हणत एकविसावे शतक आले. त्यातील दोन दशके संपतसुद्धा आली. यापूर्वी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारतवासीयांना आधुनिक, सशक्त, सामर्थ्यशाली भारताचे स्वप्न दाखविले. आम्ही ते मनावर घेतले. सर्वांना वाटू लागले भारत महासत्ता बनणार. ते स्वप्न एका वास्तवावर आधारित होते. देशातील लोकसंख्येत या कालखंडात तरुणांची संख्या सर्वाधिक असणार. तरुण म्हणजे नवचैतन्याचा झरा. ‘नवे ते हवे’ म्हणत, स्वप्नांच्या मागे पळणारा. सर्वस्व पणाला लावणारा. तरुणाईने मनावर घेतले तर भारताला महासत्ता बनण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मात्र, आपण त्या दिशेने जात आहोत का?

हा प्रश्न पडण्याचे कारण, नुकतीच ‘लोकमत’मध्ये बातमी आली. मेळघाटातील चाकर्दा गावखेड्यात एका वृद्धाच्या जखमेत अळ्या झाल्या. ही बातमी बाहेर समजली. या घटनेमुळे गावाने त्या दिवशी उपवास केला. झाले असे की, त्या गावातील एका वृद्धाच्या पायाला दुचाकीचा सायलेन्सर भाजला. त्या वृद्धाला मधुमेह आहे. जखम भरून येत नव्हती. त्याच्या जखमेत अळ्या झाल्या. जर कोणाच्या जखमेत अळ्या झाल्या, तर म्हणे गावात वाघ येतो. या वृद्धाच्या जखमेत अळ्या पडल्याची बातमी पसरली आणि गावात पेटलेल्या चुली विझविण्यात आल्या. त्या वृद्धाला तेथील पुजाऱ्याने गावाबाहेर नेले. नदीकाठी पूजा आणि विधी केले. जखमींवर उपचार केले. अळ्या बाहेर काढल्या. त्या व्यक्तीला कोपºयात खड्डा खोदून त्यावर बसविले. तेथे अग्नी पेटविला. ‘भागो रे भागो, तेरा घर जल रहा है’ असे म्हणताच, ती व्यक्ती तेथून बाहेर पडली. त्यानंतर गावातील चुली पेटल्या.

तोपर्यंत अख्खा गाव उपाशी होता. ही बातमी वाचून प्रश्न पडला, खरंच आपण महासत्ता बनणार का? आजपर्यंत ज्या राष्ट्रांनी जगाचे नेतृत्व केले, त्या राष्ट्रांबाबत दोन गोष्टी समान आहेत. एक म्हणजे या राष्ट्रांनी त्यापूर्वी सर्वसमावेशकता जपली होती. दुसरे त्या राष्ट्रांनी विज्ञानाची कास पकडली होती. आपण पहिल्या गोष्टीमध्ये कोठे आहोत? यावर भाष्य करणार नाही. मात्र विज्ञानाची कास आपण खरंच पकडली आहे का? याचा विचार जरूर करणार आहोत.
विज्ञान आणि शास्त्र यांत एक साम्य आहे ते म्हणजे हे नियमाला धरून असते. शास्त्र म्हणजे एखाद्या विषयाची नियमाला धरून मांडणी करणे. हे नियम स्थल, कालसापेक्ष असू शकतात. अनेकदा व्यक्तिसापेक्षही असतात. यामुळे भाषाशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र सारे काही शास्त्र बनते. विज्ञानाचे मात्र तसे नाही. विज्ञानाची मांडणी नियमावरच असते. मात्र, हे नियम स्थल, काल, व्यक्तिसापेक्ष नसतात.

यातून केवळ विज्ञानशास्त्र राहते. फिजिक्स त्यामुळेच मराठीमध्ये पदार्थविज्ञानशास्त्र बनते. ते निखळ सत्य असते. हे सत्य जाणून घेण्याचा हक्क सर्वांना आहे. मात्र, तो अनेक कारणांनी आपल्यापर्यंत पोहोचत नाही. काहीवेळा पोहोचू दिला जात नाही. सर्वसामान्य माणसे त्याचा शोध घेऊ शकत नाहीत. त्यांच्याजवळ इतका वेळही असत नाही. त्यामुळे तो सत्यापर्यंत पोहोचत नाही. अशा सर्वसामान्य वैज्ञानिक विचारसरणी नसणाºया लोकांना मग अवैज्ञानिक गोष्टींनी भारावून टाकत, वैज्ञानिक प्रयोगांना चमत्कार म्हणून सांगत फसवले जाते. त्यातून पुढे अंधश्रद्धा निर्माण होतात. असा अंधश्रद्ध समाज कर्मकांडात रूतून बसतो आणि त्याची क्रयशक्ती राष्ट्रबांधणीसाठी वापरली जात नाही. त्यातून चाकार्दासारख्या घटना घडतात.

जखमीला डॉक्टरकडून नव्हे पुजाºयाकडून उपाय होतात. एकीकडे आपण अवकाशात माणूस पाठवणारा चवथा देश बनणार आहोत. तर दुसरीकडे चाकार्दा. म्हणून सामर्थ्यशाली भारत बनवण्यासाठी आपण अज्ञानेश्वर न राहत, विज्ञानाची कास पकडत विज्ञानेश्वर व्हायला हवे.

(लेखक विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक आणि शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव आहेत.)

Web Title: 'Science of ignorance- science

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.